ज्ञानेश कुमार राजीनामा द्या ;लोकशाही आणि मतदानाचा हक्क वाचवण्यासाठी १० ऑक्टोबरला नाशिकमध्ये टॉर्च मार्च !
नाशिक प्रतिनिधी

नाशिक शहरातील अशोक स्तंभ येथे भव्य अशा टॉर्च मार्चला सुरुवात होताच नाशिक पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. यामध्ये एआयएसएफचे तल्हा शेख, प्राजक्ता कापडणे, कॉग्रेसचे ज्ञानेश्वर काळे, समाधान बागुल, छात्रभारतीचे राज माळी, अनुजा तिकांडे, एसएफआयचे राहुल गायकवाड, दर्शन खांडेकर तसेच अजमल खान, कल्याणी अहिरे, रोहित वाघ, स्वरुप पिसे, रोहित खरे, ज्योती मोरे, अक्षय भोसले यांच्यासह २६ विद्यार्थी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, त्यांच्यावर कारवाई करून त्यांना तातडीने अटक करावी, तसेच विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेमुळे नागरिकांच्या मतदानाच्या हक्कावर निर्माण झालेला धोका आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव याविरोधात विविध सामाजिक, राजकीय आणि लोकशाहीवादी पक्ष व संघटना एकत्र येत १० ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये टॉर्च मार्चचे आयोजन करण्यात आले.
एसआयआर प्रक्रियेची पारदर्शकता, मतदार यादीतील वगळण्यात आलेली नावे, फॉर्म ६ मधील बदल आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाने जनतेसमोर स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती ठेवणे आवश्यक आहे. एसआयआर प्रक्रियेमुळे ज्यांचे मतदानाचे हक्क बाधित झाले आहेत, त्यांचे हक्क तातडीने बहाल करण्यात यावेत आणि ही प्रक्रिया पूर्णपणे रद्द करण्यात यावी, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली.



