आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“रात हमारी, आज़ादी हमारी”च्या घोषणांनी नाशिकमध्ये ‘वॉक फॉर वुमन’; महिलांच्या स्वातंत्र्याच्या हक्कासाठी AISFचा पुढाकार

नाशिक : महिलांच्या सुरक्षिततेचा आणि स्वातंत्र्याचा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ) च्या वतीने रविवारी, १८ ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये ‘वॉक फॉर वुमन’ या रॅलीचे आयोजन करण्यात आले. “रात हमारी, आज़ादी हमारी” या घोषणेसह कॅनडा कॉर्नर येथून सुरू झालेली ही रॅली शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचून संपन्न झाली. या उपक्रमातून महिलांच्या सुरक्षिततेच्या नावाखाली त्यांच्यावर लादली जाणारी बंधने, पितृसत्ताक मानसिकता आणि सार्वजनिक जागांवरील महिलांच्या समान हक्कांचा प्रश्न ठामपणे मांडण्यात आला.

महिलांनी रात्री घराबाहेर पडू नये, त्यांच्या कपड्यांवर किंवा वागण्यावर बंधने असावीत, त्यांनी कुठे आणि किती वेळ बाहेर राहावे, याबाबत समाजाकडून नियंत्रण ठेवण्याच्या प्रवृत्तीला रॅलीतून विरोध करण्यात आला. महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी त्यांच्यावरच टाकण्याऐवजी छेडछाड, लैंगिक हिंसा आणि भेदभावाला प्रोत्साहन देणाऱ्या मानसिकतेत बदल घडवणे आवश्यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. रस्ते, सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक संस्था, कामाची ठिकाणे आणि इतर सार्वजनिक जागांवर महिलांना कोणत्याही भीतीशिवाय वावरता आले पाहिजे, अशी भूमिका सहभागी आंदोलकांनी मांडली.

“रात हमारी, आज़ादी हमारी” ही घोषणा महिलांच्या रात्रीच्या वेळी मुक्तपणे वावरण्याच्या अधिकाराचे प्रतीक आहे. महिलांच्या स्वातंत्र्याला वेळेची किंवा ठिकाणाची मर्यादा असू नये. स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा, शिक्षण घेण्याचा, रोजगार मिळवण्याचा आणि सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याचा अधिकार महिलांना आहे. हा अधिकार प्रत्यक्षात आणण्यासाठी समाजातील पुरुषांनीही स्त्री-पुरुष समानतेच्या बाजूने उभे राहणे आणि पितृसत्ताक विचारांना आव्हान देणे गरजेचे आहे, असा संदेश या रॅलीतून देण्यात आला.

महिलांच्या हक्कांसाठीचा संघर्ष हा अधिक समताधिष्ठित आणि लोकशाहीवादी समाज घडवण्याच्या लढ्याचा महत्त्वाचा भाग आहे. महिलांना सुरक्षिततेसाठी स्वतःच्या स्वातंत्र्याशी तडजोड करावी लागणार नाही, अशी सामाजिक परिस्थिती निर्माण करण्याची जबाबदारी समाज आणि प्रशासन दोघांचीही आहे. यासाठी केवळ कायदे पुरेसे नसून महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि दैनंदिन सामाजिक व्यवहार यांमध्येही बदल होणे आवश्यक आहे, अशी भूमिका एआयएसएफच्या वतीने मांडण्यात आली.

या रॅलीत एआयएसएफच्या प्राजक्ता कापडणे, कृष्णा वाघ, जिज्ञासा जाधव, हर्षाली अढांगळे, प्रियंका अक्कर, गौरी तिडके, ज्योती मोरे, दीक्षा सोनवणे, राधा शेलार, शामली गायकवाड, एसएफआयच्या राणी जगधने, साक्षी काकडे यांच्यासह इतर आयोजक सहभागी झाले होते. महिलांच्या स्वातंत्र्याचा आणि समानतेचा मुद्दा सार्वजनिक चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी तसेच या प्रश्नावर व्यापक सामाजिक एकजूट निर्माण करण्यासाठी एआयएसएफने या उपक्रमाचे आयोजन केले.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.