नाशिक रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या लढ्याला मोठे यश! गुणांक १ ऐवजी २ लागू करण्याचे आणि जमिनींचे फेरसर्वेक्षण करण्याचे शासनाचे आदेश करण गायकर यांच्या नेतृत्वाखालील सातत्यपूर्ण आंदोलनाला यश;वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत पुराव्यांसह मांडलेल्या मागण्यांची शासनाकडून दखल
नाशिक प्रतिनिधी

नाशिक, दि.२२ ऑक्टोबर २०२६ :
नाशिक रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सातत्यपूर्ण लढ्याला मोठे यश मिळाले आहे.रिंग रोडच्या भूसंपादन प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमितता,जमिनींच्या मोबदल्यात झालेल्या त्रुटी,गुणांक निश्चित करताना झालेला अन्याय आणि पाण्याची उपलब्धता असूनही जमिनींची जिरायती म्हणून करण्यात आलेली नोंद,या प्रश्नांवर शेतकऱ्यांच्या वतीने सातत्याने आंदोलने करण्यात आली होती.या प्रश्नांवर अभ्यासपूर्वक,कागदपत्रे आणि पुराव्यांच्या आधारे मांडलेल्या मागण्यांची शासनाने दखल घेत दोन महत्त्वाच्या मागण्यांच्या संदर्भात आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस,पालकमंत्री मा.गिरीशभाऊ महाजन,विभागीय आयुक्त मा.प्रवीण गेडाम,नाशिक जिल्हाधिकारी मा. आयुष प्रसाद तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी शेतकरी शिष्टमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली होती.या बैठकीत शेतकरी नेते करण गायकर यांनी रिंग रोड प्रकल्पातील भूसंपादन प्रक्रियेसंदर्भात शेतकऱ्यांच्या विविध तक्रारी,चुकीच्या नोंदी,मोबदला निश्चित करताना झालेल्या त्रुटी आणि प्रशासकीय निर्णयांमुळे शेतकऱ्यांवर होणारा अन्याय याबाबत सविस्तर माहिती मांडली होती.
बाधित शेतकऱ्यांनी विविध आंदोलने,निवेदने आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या माध्यमातून आपले प्रश्न शासनासमोर मांडले.या लढ्यात शेतकऱ्यांनी दाखवलेली एकजूट,तसेच वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत अभ्यासपूर्ण पद्धतीने आणि आवश्यक पुराव्यांसह मांडलेल्या मागण्या यांमुळे या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देत.त्या अनुषंगाने शासनाकडून घेण्यात आलेले निर्णय हे शेतकऱ्यांच्या एकजुटीचे आणि संघर्षाचे यश असल्याची भावना सर्व शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
१.गुणांक १ ऐवजी गुणांक २ लागू करण्यासंदर्भात आदेश
नाशिक रिंग रोड प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेत काही गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनींसाठी गुणांक २ ऐवजी गुणांक १ लागू करण्यात आल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना कमी मोबदला मिळाल्याची तक्रार करण्यात आली होती.गुणांकाचा थेट परिणाम भूसंपादनाच्या मोबदल्यावर होत असल्याने या त्रुटीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
या गंभीर प्रश्नाकडे करण गायकर यांनी शासनाचे लक्ष वेधत संबंधित कागदपत्रे आणि पुराव्यांच्या आधारे शेतकऱ्यांची बाजू मांडली होती.या मागणीची दखल घेत गुणांक १ ऐवजी गुणांक २ लागू करण्यासंदर्भात शासनाकडून सकारात्मक आदेश देण्यात आले आहेत.संबंधित गावांमध्ये या आदेशाची योग्य अंमलबजावणी करून पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार न्याय्य आणि सुधारित मोबदला मिळावा,अशी मागणी आहे.
२.जिरायती नोंद झालेल्या जमिनींचे फेरसर्वेक्षण
रिंग रोडच्या भूसंपादन प्रक्रियेत काही शेतकऱ्यांच्या जमिनींना पाण्याची उपलब्धता असूनही त्यांची जिरायती म्हणून नोंद करण्यात आल्याचा मुद्दा बैठकीत मांडण्यात आला होता.जमिनीची प्रत्यक्ष स्थिती, सिंचनासाठी उपलब्ध पाणी आणि शेतीचा प्रकार यांचा योग्य विचार न झाल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या वास्तविक स्वरूपानुसार मोबदला मिळण्यात अडचणी निर्माण होतात.
या त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित जमिनींचे फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.प्रत्यक्ष पाहणी, पाण्याची उपलब्धता,सिंचनाची स्थिती आणि जमिनीचा प्रत्यक्ष वापर यांची तपासणी करून नियमानुसार पात्र जमिनींची हंगामी बागायती किंवा बागायती म्हणून योग्य वर्गवारी करण्यात यावी,अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.या फेरसर्वेक्षणातून जमिनींच्या नोंदींमधील चुका दुरुस्त करून पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार योग्य मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा आहे.
नाशिक रिंग रोड बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा,त्यांच्या जमिनींचे योग्य मूल्यांकन व्हावे आणि भूसंपादन प्रक्रियेतील त्रुटी दूर व्हाव्यात,यासाठी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन सातत्याने आंदोलनात्मक भूमिका घेतली.विविध निवेदने,प्रशासकीय पातळीवरील पाठपुरावा,आंदोलनांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधणे आणि शेतकऱ्यांच्या तक्रारी पुराव्यांसह मांडणे,या मार्गांनी हा लढा पुढे नेण्यात आला.
वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्या केवळ भावनिक पातळीवर न मांडता त्यामागील वस्तुस्थिती,कागदपत्रे आणि भूसंपादनातील त्रुटींचा अभ्यास करून मांडण्यात आल्या.या मागण्यांची दखल घेऊन शासनाने दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर आदेश दिल्याने शेतकऱ्यांच्या संघर्षाला सकारात्मक यश मिळाले आहे. हा विजय कोणत्याही एका व्यक्तीचा नसून,आपल्या हक्कांसाठी एकजुटीने लढणाऱ्या समस्त बाधित शेतकऱ्यांचा असल्याचे करण गायकर यांनी स्पष्ट केले.
मात्र,आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन प्रत्येक पात्र शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही.गुणांक २ लागू करणे,जमिनींचे पारदर्शक फेरसर्वेक्षण करणे,चुकीच्या नोंदी दुरुस्त करणे आणि नियमानुसार सुधारित मोबदला मिळवून देणे,यासाठी पुढील काळातही पाठपुरावा सुरू राहणार आहे. तसेच वरील दोन निर्णयाप्रमाणे मखमलाबाद ते गोवर्धन व विंचूर गवळी या गावांची अलाइनमेंट तात्काळ बदलण्यात यावी हायवे नंबर २९ मधील शेतकऱ्यांचे भूसंपादन करून त्यांना २०१३ च्या कायद्याप्रमाणे न्याय देण्याची मागणी केलेली आहे तीही लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शासनाचे मनःपूर्वक आभार
शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेऊन सकारात्मक निर्णयाच्या दिशेने पाऊल उचलल्याबद्दल मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस,पालकमंत्री मा.गिरीश महाजन,अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर महसूल अप्पर मुख्य सचिव विकास खरगे एमएसआयडी सीचे ब्रिजेश दीक्षित,विभागीय आयुक्त मा.प्रवीण गेडाम,जिल्हाधिकारी मा.आयुष प्रसाद,रंजीत हांडे आणि बैठकीत सहभागी झालेल्या सर्व संबंधित अधिकारी यांचे समस्त बाधित शेतकऱ्यांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
कोट –
शेतकऱ्यांची एकजूट,सातत्यपूर्ण आंदोलन आणि पुराव्यांच्या आधारे केलेला पाठपुरावा यांमुळे न्यायाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.शेतकऱ्यांच्या जमिनींचा योग्य मोबदला आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठीचा लढा सुरू असून मखमलाबाद ते गोवर्धन व विंचूर गवळी येथील अलाइनमेंट बदलाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असून याबाबत शासन स्तरावरून अंतिम कारवाई सुरू आहे तसेच हायवे नंबर २९ मधील शेतकऱ्यांना सुद्धा याचप्रमाणे अंतिम न्याय मिळेपर्यंत सुरू राहणार आहे



