आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

२० वर्षांनंतर कोपरगावच्या मुलींचा व्हॉलीबॉल संघ राज्यस्तरावर! गौतम पब्लिक स्कूलच्या मुलींचे ऐतिहासिक यश; हॉकीच्या तिन्ही संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड आमदार आशुतोषदादा काळे यांच्यासह कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडून यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन

ज्ञानेश्वर पोटे

गौतम नगर : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत गौतम पब्लिक स्कूल, गौतम नगरच्या विद्यार्थ्यांनी कोपरगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तब्बल २० वर्षांनंतर कोपरगाव तालुक्यातून गौतम पब्लिक स्कूलचा १४ वर्षांखालील मुलींचा व्हॉलीबॉल संघ राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर शालेय जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत शाळेच्या १४, १७ आणि १९ वर्षांखालील तिन्ही संघांनी दणदणीत विजय मिळवत विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. व्हॉलीबॉलमधील ऐतिहासिक यश आणि हॉकीतील तिहेरी विजयामुळे गौतम पब्लिक स्कूलच्या क्रीडा गुणवत्तेची सर्वत्र चर्चा होत आहे.
व्हॉलीबॉलमध्ये २० वर्षांनंतर ऐतिहासिक कामगिरी!


क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत १५ ऑक्टोबर २०२६ रोजी मोहोळ, जिल्हा सोलापूर येथे १४ वर्षांखालील मुलींच्या विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या मुलींनी अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर विजयाची मालिका कायम ठेवली आणि राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश निश्चित केला.

उपांत्यपूर्व सामन्यात गौतम पब्लिक स्कूलचा सामना पुणे ग्रामीणच्या संघाशी झाला. या सामन्यात गौतमच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये १५-४ अशी गुणांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला.
यानंतर उपांत्य सामन्यात गौतम पब्लिक स्कूलसमोर सोलापूर ग्रामीणच्या संघाचे आव्हान होते. या सामन्यातही गौतमच्या मुलींनी आपल्या खेळातील कौशल्य आणि सांघिक समन्वय सिद्ध करत दुसऱ्या सेटमध्ये २५-५ असा एकतर्फी विजय मिळवला आणि अंतिम फेरीत धडक मारली.


अंतिम सामन्यात गौतम पब्लिक स्कूल, अहिल्यानगर आणि पुणे ग्रामीण यांच्यात लढत झाली. या सामन्यात गौतमच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्याला कडवी झुंज देत दुसऱ्या सेटमध्ये २५-१६ असा विजय मिळवला. उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर गौतम पब्लिक स्कूलच्या संघाने विभागीय स्पर्धेत यश संपादन करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली.
विशेष म्हणजे, कोपरगाव तालुक्यातून तब्बल २० वर्षांनंतर गौतम पब्लिक स्कूलचा मुलींचा व्हॉलीबॉल संघ राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत खेळणार आहे. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेत हा संघ पुणे विभागाचे नेतृत्व करणार असल्याने कोपरगाव तालुक्याच्या क्रीडा इतिहासात या यशाची विशेष नोंद झाली आहे.

हॉकीच्या तिन्ही संघांची विभागीय स्पर्धेसाठी दिमाखदार निवड!
व्हॉलीबॉलमधील यशाबरोबरच गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी संघांनीही जिल्हास्तरीय स्पर्धेत शानदार कामगिरी केली. १४, १७ आणि १९ वर्षांखालील तिन्ही वयोगटांतील संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विभागीय स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळवला.
१४ वर्षांखालील हॉकी संघाचा अंतिम सामना यश अकॅडमी, सोनई विरुद्ध गौतम पब्लिक स्कूल, गौतम नगर असा झाला. या सामन्यात गौतमच्या संघाने उत्कृष्ट खेळ करत यश अकॅडमी, सोनईचा ३-० असा पराभव केला.
१७ वर्षांखालील गटातही गौतम पब्लिक स्कूलच्या संघाने यश अकॅडमी, सोनईविरुद्ध ३-० असा दणदणीत विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले.
१९ वर्षांखालील गटातील अंतिम सामना गौतम पब्लिक स्कूल, गौतम नगर आणि संगमनेर कॉलेज यांच्यात झाला. या सामन्यात गौतमच्या खेळाडूंनी आक्रमक आणि नियोजनबद्ध खेळ करत ३-० असा विजय मिळवला.
या तिन्ही विजयांमुळे गौतम पब्लिक स्कूलचे १४, १७ आणि १९ वर्षांखालील हॉकी संघ आगामी विभागीय स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत. त्यामुळे एका बाजूला मुलींच्या व्हॉलीबॉल संघाने राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवला, तर दुसऱ्या बाजूला हॉकीच्या तिन्ही संघांनी विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
आमदार आशुतोषदादा काळे यांच्याकडून खेळाडूंचे अभिनंदन!
गौतम पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाची दखल घेत कोपरगाव तालुक्याचे आमदार माननीय श्री. आशुतोषदादा काळे यांनी व्हॉलीबॉल संघातील खेळाडूंची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.
यावेळी त्यांनी जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत यश संपादन केलेल्या १४, १७ आणि १९ वर्षांखालील तिन्ही संघांचेही अभिनंदन केले. खेळाडूंच्या यशामागे असलेल्या प्रशिक्षकांचे, क्रीडा विभागाचे आणि शिक्षकांचेही त्यांनी कौतुक केले.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून यशस्वी खेळाडूंचे कौतुक!
गौतम पब्लिक स्कूलच्या या दुहेरी क्रीडा यशाबद्दल कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माननीय श्री. अशोकदादा काळे साहेब, सचिव सौ. चैतालीताई काळे साहेब, निरीक्षक श्री. नारायण बारे, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, सदस्य आणि शाळेचे प्राचार्य श्री. नूर शेख यांनी जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केलेल्या १४, १७ आणि १९ वर्षांखालील हॉकी संघांचे तसेच विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत दणदणीत विजय मिळवणाऱ्या १४ वर्षांखालील मुलींच्या संघाचे अभिनंदन केले.
सर्व यशस्वी खेळाडूंना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देत त्यांनी राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत तसेच आगामी विभागीय हॉकी स्पर्धांमध्येही उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचा आणि अहिल्यानगर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाला खेळाडूंच्या मेहनतीची जोड!
गौतम पब्लिक स्कूलच्या या उल्लेखनीय यशामागे शाळेचे प्राचार्य श्री. नूर शेख, क्रीडा विभागप्रमुख श्री. रमेश पटारे, क्रीडाशिक्षक व प्रशिक्षक श्री. राजेंद्र आढाव, श्री. इसाक सय्यद, श्री. महेश गोंडे यांच्यासह हाऊस मास्टर, पर्यवेक्षक आणि सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंची नियमित मेहनत, शिस्तबद्ध सराव, प्रशिक्षकांचे योग्य नियोजन आणि सांघिक भावनेमुळे हे यश साध्य झाले आहे.
राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्व करणारा मुलींचा संघ आणि विभागीय हॉकी स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याचे नेतृत्व करणारे तिन्ही संघ यांच्यामुळे गौतम पब्लिक स्कूलने क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या यशामुळे कोपरगाव तालुक्यातील उदयोन्मुख खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली असून, आगामी स्पर्धांमध्येही हे संघ उज्ज्वल कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.