ताज्या घडामोडी

रिंग रोड बाधित शेतकऱ्यांची एमएसआयडीसी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून फसवणूक होत असल्याचा आरोप;कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाच्या दिवशी सामूहिक आत्मदहन आंदोलनाचा इशारा! विंचूर गवळी व माडसांगवी येथील चुकीचे निवाडे रद्द करण्याचे उपजिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन; मखमलाबाद–गोवर्धन अलाइनमेंट रद्द करून नव्याने प्रस्ताव पाठविण्याची मागणी – करण गायकर

नाशिक : नाशिक रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट सूचना दिलेल्या असतानाही एमएसआयडीसीचे अधिकारी आणि नाशिक जिल्हाधिकारी प्रशासनाकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी केला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही आणि अधिकाऱ्यांनी आपली मनमानी थांबवली नाही,तर कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाच्या दिवशी सर्व बाधित शेतकरी सामूहिक आत्मदहन आंदोलन करतील,असा इशाराही त्यांनी दिला.

रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.या बैठकीत उपजिल्हाधिकारी मंगरुळे यांनी विंचूर गवळी आणि माडसांगवी या गावांतील जाहीर झालेले निवाडे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे असल्याचे मान्य करून ते रद्द करण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन दिले.संबंधित निवाडे रद्द करून शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढल्यानंतर नव्याने निवाडे जाहीर करण्यात येतील,असेही त्यांनी सांगितले.या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेले आंदोलन तात्पुरते स्थगित केले.मात्र,आश्वासनाची अंमलबजावणी झाली नाही किंवा अन्य कोणत्याही गावात शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा निकाल न लावता नव्याने निवाडे जाहीर केले,तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा गायकर यांनी दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मखमलाबाद ते गोवर्धन तसेच विंचूर गवळी येथील अलाइनमेंटबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत पुढील प्रक्रिया करू नये,अशा सूचना देण्यात आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.तसेच ज्या गावांमध्ये गुणांक एक लागू करण्यात आला आहे,तेथे नियमानुसार गुणांक दोन लागू करणे,पाण्याचे स्रोत असूनही जिरायत दराने मोबदला मिळालेल्या शेतकऱ्यांचे फेरसर्वेक्षण करणे,द्राक्षबागा व इतर फळबागांचे योग्य मूल्यांकन करणे आणि सर्व १४ गावांतील शेतकऱ्यांच्या तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी करून सोडवणूक करणे आवश्यक आहे.मात्र,या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

मखमलाबाद ते गोवर्धन या मार्गाची प्रत्यक्ष स्थळपाहणी करून सध्याची अलाइनमेंट रद्द करावी आणि पर्यायी अलाइनमेंटचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावा,अशी मागणी करण गायकर यांनी केली.विंचूर गवळी येथे ६० मीटरचा डीपी रोड अस्तित्वात असताना दुसऱ्या मार्गाने रस्ता नेण्याची गरज काय,असा सवाल उपस्थित करत नियोजनबद्ध डीपी रोडच्या मार्गानेच रस्ता न्यावा,अशी भूमिका त्यांनी मांडली.कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या जमिनी,विहिरी,पाण्याचे स्रोत,फळबागा आणि सुपीक जमिनींचे नुकसान होणार नाही,याची काळजी घेण्याची मागणीही करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनांनुसार प्रत्येक बाधित गावात कृषी विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग,प्रांताधिकारी, नगररचना विभाग आणि इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे भेट देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात.शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि सर्व प्रश्न मार्गी लागल्यानंतरच पुढील कार्यवाही करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.

एमएसआयडीसीचे अधिकारी बारवकर,कोळी आणि पडांगळे हे शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात भूमिका घेत असल्याचा आरोप गायकर यांनी केला.संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून,अलाइनमेंट बदलण्याच्या प्रक्रियेतही अडथळे निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.या रस्त्याच्या अलाइनमेंटसंदर्भात कथित अनियमितता आणि भ्रष्टाचाराबाबतही शेतकऱ्यांमध्ये संशय व्यक्त केला जात असून,या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी,अशी मागणी त्यांनी केली.अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याऐवजी त्यांच्यात मतभेद निर्माण करण्याची भूमिका घेतल्यास भविष्यात परिस्थिती गंभीर होऊ शकते.त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी आणि त्यांची तातडीने बदली करावी,अशी मागणी करण गायकर यांनी केली.

नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांची पारदर्शकपणे अंमलबजावणी करावी.विंचूर गवळी गावातील अलाइनमेंटचा निर्णय प्रलंबित असताना अंतिम निवाडा जाहीर करण्याची कार्यवाही झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.शासनाच्या आदेशांचे पालन न झाल्यास शेतकऱ्यांचा प्रशासनावरील विश्वास उडेल,असे गायकर यांनी सांगितले.जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याऐवजी त्यांच्या अडचणी वाढवल्या,तर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उद्रेक शासनाला परवडणारा ठरणार नाही,असा इशाराही त्यांनी दिला.

विंचूर गवळी आणि माडसांगवी येथील निवाडे रद्द करण्याबाबत दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी करावी,सर्व बाधित गावांतील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, मखमलाबाद–गोवर्धन अलाइनमेंटचा फेरविचार करावा आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करावी,या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.मागण्या मान्य न झाल्यास कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाच्या दिवशी सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

“शेतकऱ्यांना न्याय मिळावा,हीच आमची भूमिका आहे.मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी झाली पाहिजे.अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होता कामा नये.आश्वासनांची पूर्तता करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा;अन्यथा शेतकऱ्यांचा संघर्ष अधिक तीव्र होईल,असे छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी या बैठकीसाठी दीपक हगवणे,सुदर्शन पाटील,अक्षय कातड,पंकज खताळे,सागर लोणे,रवी पेखळे,आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.