आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगगडाच्या विकासाला वेग रस्ते, पार्किंग, आरोग्य, स्वच्छता, कचरा व्यवस्थापनासह भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा कृती आराखडा

सोमनाथ मानकर सप्तश्रुंगी गड

सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगगड व नांदुरी परिसरात येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयी-सुविधा, वाहतूक व्यवस्था, आरोग्य सेवा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि सुरक्षिततेसाठी प्रशासनाने विविध उपाययोजनांना गती देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात १ ऑक्टोबर २०२६ रोजी सप्तशृंगगड, ता. कळवण येथे समन्वय बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, पोलीस प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, ट्रस्ट, ग्रामपंचायत तसेच नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत सप्तशृंगगडावर मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता असल्याने फक्त गडावरीलच नव्हे, तर परिसरातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांशी समन्वय साधून नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

३१ ऑक्टोबरला ध्वजारोहण

सिंहस्थ महाकुंभमेळ्याचे ध्वजारोहण ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणार आहे. तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२७ मध्ये तीन प्रमुख अमृतस्नानांचे मुहूर्त निश्चित करण्यात आले आहेत. पुढील दोन वर्षांच्या कालावधीत विविध महत्त्वाचे धार्मिक मुहूर्त होणार असल्याने सर्व विभागांनी त्यानुसार पूर्वनियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सप्तशृंगगड परिसरात पायाभूत सुविधांची ९ कामे प्रस्तावित

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सप्तशृंगगड परिसरातील पायाभूत सुविधांसाठी ९ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नांदुरी-सप्तशृंगगड रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम प्रगतीपथावर असून ते लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तसेच भूस्खलन प्रतिबंधक कामे करण्यात आली असून गडावर पोलीस चौकीचे कामही हाती घेण्यात आले आहे.

वाहतूक व पार्किंगसाठी विशेष नियोजन

कुंभमेळ्याच्या काळात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नांदुरी येथे मोठ्या प्रमाणावर वाहनतळाची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. सध्या सुमारे ८ एकर जागेत ३ हजार वाहनांची पार्किंग क्षमता असून साधारणतः २ हजार वाहने येथे येतात. कुंभमेळ्यातील वाढीव गर्दी लक्षात घेऊन पार्किंगची क्षमता व व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गडावर सध्या स्वतंत्र वाहनतळ नसल्याने भाविकांना खासगी जागांमध्ये वाहने लावावी लागतात. त्यामुळे गडावर योग्य वाहनतळ उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बसस्थानक, शटल बस सेवा आणि खासगी वाहनांसाठी स्वतंत्र व स्पष्ट व्यवस्था करण्यावरही भर देण्यात आला.

आपत्कालीन सेवांसाठी स्वतंत्र मार्ग

अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन सेवांना गर्दीत अडथळा येऊ नये यासाठी स्वतंत्र आपत्कालीन मार्ग निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कुंभमेळ्याच्या कालावधीत पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त आराखडा तयार करून अपेक्षित गर्दी, वाहतूक, आपत्कालीन परिस्थिती आणि भाविकांच्या सुरक्षेचे नियोजन करण्याचे ठरले आहे.

गडाच्या पायऱ्यांजवळील स्ट्रीट वेंडर्समुळे गर्दी वाढून चेंगराचेंगरीचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विक्रेत्यांचे नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

पायऱ्यांवर नारळ फोडण्यास मनाई करण्याची सूचना

गडाच्या पायऱ्यांवर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करण्यावर चर्चा झाली. पायऱ्यांवर नारळ फोडल्यामुळे पाणी किंवा अन्य द्रव सांडून घसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पायऱ्यांवर नारळ फोडण्याची प्रथा बंद करण्याची आणि पायऱ्यांवर कोणताही द्रव साचणार नाही याची काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.

याशिवाय पूर्वी घडलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टने आवश्यक बचाव साहित्य खरेदी करून ट्रस्टचे कर्मचारी व ग्रामस्थांना त्याचे प्रशिक्षण देण्याचेही सुचविण्यात आले आहे.

दर्शनरांगेसाठी वेटिंग हॉलची मागणी

सप्तशृंगगडावर भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यात्रा व नवरात्र काळात दर्शनरांग गडाच्या पायऱ्यांपासून गावातील रस्त्यांपर्यंत पोहोचते. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी स्वतंत्र वेटिंग हॉल उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आरोग्य सुविधांना प्राधान्य

कुंभमेळ्याच्या काळात गडावर तात्पुरते रुग्णालय, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका आणि आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सप्तशृंगगडावरील भाविक आणि ग्रामस्थांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी ट्रस्टच्या अध्यक्षांकडून करण्यात आली. यासाठी ट्रस्ट व ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करावा, अशी कार्यवाही निश्चित करण्यात आली आहे.

स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाचा मोठा आराखडा

कुंभमेळ्याच्या काळात गडावर मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होणार असल्याने त्यासाठी स्वतंत्र आणि व्यापक आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या ट्रस्ट, रोपवे व्यवस्थापन आणि ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून गडाची दैनंदिन स्वच्छता केली जाते. मात्र कुंभमेळ्यात अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे.

आराखड्यात सध्या निर्माण होणारा कचरा, कुंभमेळ्याच्या सुमारे ६० दिवसांत निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण, आवश्यक मनुष्यबळ, डस्टबिनची संख्या, कचरा वाहतूक यंत्रणा, कचरा साठवणूक जागा आणि प्रक्रिया प्रकल्प यांचा समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सध्या गडावरील बसस्थानकाजवळ कचरा संकलित करून मालेगाव येथील संस्थेमार्फत त्याची विल्हेवाट लावली जाते. भविष्यात स्थानिक पातळीवरच कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न केले जाणार आहेत.

निर्माल्यापासून अगरबत्ती, धूपबत्ती निर्मितीचा विचार

मंदिरात जमा होणाऱ्या निर्माल्याचे स्वतंत्र संकलन करून त्यापासून अगरबत्ती व धूपबत्ती तयार करण्याचा प्रकल्प उभारण्याचा विचार करण्यात आला आहे. यासाठी ट्रस्टने संबंधित संस्था किंवा स्टार्टअप्सशी समन्वय साधण्याची सूचना करण्यात आली आहे.

तसेच तीर्थक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या नारळाच्या करवंट्यांपासून कोकोपीट तयार करण्याचा प्रकल्प उभारण्याचा विचार असून त्यासाठी CSR निधीचा वापर करण्याची शक्यता तपासण्याचे ठरले आहे.

ओला कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी CSR निधीचा विचार

ओला कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून CSR किंवा इतर उपलब्ध निधीतून आर्थिक स्रोत उभारण्याची शक्यता तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रकल्प उभारल्यानंतर त्याचे संचालन, मनुष्यबळ, देखभाल आणि नियमित खर्च यांचेही नियोजन करणे आवश्यक असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची व्यवस्था

गडावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत केली जाते. कुंभमेळ्याच्या काळात भाविकांची संख्या वाढणार असल्याने पुरेसा पाणीपुरवठा, नियमित देखभाल आणि पाण्याची गुणवत्ता सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे.

नांदुरी व गड या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात तात्पुरती स्वच्छतागृहे उभारण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. आवश्यकतेनुसार मोबाईल स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याचेही नियोजन करण्यात येणार आहे.

STP प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी (STP) जागेची अडचण निर्माण होत असल्याने वन विभागाने संबंधित प्रस्तावाला गती देऊन आवश्यक सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गडावरील वीज व्यवस्था भूमिगत करण्याचे काम सुरू

सप्तशृंगगडावरील विद्युतवाहिन्या आणि संबंधित यंत्रणा भूमिगत करण्याची कार्यवाही महावितरणमार्फत सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तात्पुरत्या पार्किंगच्या ठिकाणी विद्युतपुरवठा देण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करून योग्य व्यवस्था करण्याच्या सूचनाही महावितरणला देण्यात आल्या.

याशिवाय वणी ते सप्तशृंगगड पायी मार्गावर संपूर्ण प्रकाश व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या मार्गावर अनेक भाविक अनवाणी चालत येत असल्याने सुरक्षिततेसाठी प्रकाश व्यवस्था अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले.

नांदुरीतील भक्तनिवासाचे काम जून २०२७पर्यंत पूर्ण होणार

नांदुरी येथे बसस्थानकाचे काम पूर्ण झाले असून भक्तनिवासाचे काम सुरू आहे. कुंभमेळ्याच्या काळात भाविकांच्या निवासासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे. जून २०२७पर्यंत भक्तनिवासाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

दिशादर्शक फलक व डिजिटल सायनेज

कुंभमेळ्यात देशभरातून भाविक येणार असल्याने दिशादर्शक फलक, सूचना फलक आणि डिजिटल सायनेज उभारण्यावरही भर देण्यात आला. भाविकांना विविध धार्मिक स्थळे, रस्ते, पार्किंग, आरोग्य सुविधा आणि इतर आवश्यक ठिकाणांची माहिती सहज मिळावी यासाठी त्यांची संख्या व ठिकाणे निश्चित करून स्वतंत्र आराखडा तयार केला जाणार आहे.

सौंदर्यीकरणासोबत पर्यावरण संवर्धन

सप्तशृंगगड परिसरात स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, सौंदर्यीकरण, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपाययोजना राबविण्याचेही निश्चित करण्यात आले आहे.

प्रशासनासमोर मोठे आव्हान

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात सप्तशृंगगडावर मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक, पार्किंग, आरोग्य, स्वच्छता, पाणी, वीज, सुरक्षा, आपत्कालीन सेवा आणि कचरा व्यवस्थापन या सर्व बाबींचे एकत्रित नियोजन करणे प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे.

या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित विभागांनी आपापल्या कामांचे पूर्वनियोजन करून समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात सप्तशृंगगड परिसरातील भाविकांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधायुक्त वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.