महाराष्ट्र शासनाकडून अनुसूचित जातींच्या निधीत डल्ला ; नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती शिभागाकडून राहुल गांधींना निवेदन
नाशिक : प्रतिनिधी

नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत अनुसूचित जातींच्या (SC) सर्वांगीण विकासासाठी राखीव असलेला निधीतून आतापर्यंत १२६० • ७५ कोट्यवधी रुपयांचा निधी इतरत्र वळवून महायुती सरकारने या वंचित घटकाची घोर निराशा आणि गळचेपी केली आहे, असा गंभीर आरोप नाशिक जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. या प्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान ओझर विमानतळावर त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी सविस्तर निवेदन सादर केले व या अन्यायाविरोधात संसदेत आवाज उठवण्याची विनंती केली
नाशिकमध्ये आयोजित काँग्रेसच्या ‘संघटन सृजन’ प्रशिक्षण शिबिराच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील महायुती सरकारच्या दलितविरोधी धोरणांचा पाढाच निवेदनातून वाचण्यात आला. निधी वळवल्याचा गंभीर आरोप: निवेदनात सविस्तर नमूद केल्यानुसार, अनुसूचित जातींच्या मुला-मुलींचे शिक्षण, हॉस्टेल सुविधा, स्कॉलरशिप, कौशल्य विकास आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी समाजकल्याण विभागाकडे दरवर्षी मोठा निधी दिला जातो. मात्र, विद्यमान सरकारने हा हक्काचा विकास निधी अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी खर्च न करता राजकीय हेतूने प्रेरित लाडकी बहीण योजनांकडे बेकायदेशीरपणे वळवला आहे. यामुळे दलित वस्त्यांमधील विकासकामे रखडली असून हजारो मागासवर्गीय विद्यार्थी व तरुण शासकीय लाभांपासून वंचित राहिले आहेत.
राहुल गांधी यांचे आश्वासन:काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे निवेदन स्वीकारल्यानंतर राहुल गांधी यांनी या विषयाची गंभीर दखल घेतली. “शिक्षणाचा आणि विकासाचा अधिकार हा सर्वांचा हक्क आहे, त्यात कोणताही दुजाभाव खपवून घेतला जाणार नाही,” असे सांगत वंचित आणि मागासवर्गीय समाजाच्या हक्काच्या निधीची ही चोरी आम्ही सहन करणार नाही, असा विश्वास राहुल गांधी यांनी यावेळी दिल्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच, या आर्थिक अन्यायाविरोधात दिल्लीपासून गल्लीपर्यंत काँग्रेस पक्ष तीव्र संघर्ष करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.याप्रसंगी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी आणि अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांचेसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.



