आश्रमशाळा विद्यार्थ्यांचे उपोषण मागे! धरणे आंदोलन सुरूच
नाशिक प्रतिनिधी

आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत उलगुलान महामोर्चाची घोषणा
गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण 04 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळीमागे घेण्यात आले. उपोषणास बसलेल्या एकाची प्रकृती खालावत असल्याने सकल आदिवासी विद्यार्थी कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला मात्र, उपोषण मागे घेतले असले, पण मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी केला आहे. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी लवकरच आठ ते दहा दिवसात मुंबईत उलगुलान महामोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली.
आदिवासी वसतिगृहांमधील असुविधा दूर करणे, सेंट्रल किचनचा निर्णय रद्द करणे, डोनेशनच्या नावाखाली आदिवासी आश्रम शाळा विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक लूट थांबविणे, तसेच गेल्या दोन वर्षांत वसतिगृहातील ५९३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या आरोपाची चौकशी करणे, या मागण्यांसाठी आदिवासी विकास विभागाचे मंत्री अशोक उईके यांचा राजीनामा घ्यावा, विभागाचे सचिव विजय वाघमारे, आणि आयुक्त लीना बनसोड यांना हटवावे , या मागण्यांसाठी राहुल पावरा, लक्ष्मी जाधव, आणि विवेक गावित,यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलनही सुरू होते. आंदोलन मागे घेण्यासाठी आदिवासी आयुक्तालयाकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. उलट आंदोलनाला विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद मिळत गेला.
शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने आंदोलनकर्त्यांनी मंगळवारी 01 सप्टेंबर 2026, रोजी उलगुलान महामोर्चा काढून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन केले. यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यापाठोपाठ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही आंदोलनस्थळी भेट घेऊन उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. देशातील सर्वांत मोठे आदिवासी आंदोलन उभारण्याची घोषणा त्यांनी केली होती. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनीही आंदोलनाला पाठिंबा देत उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडून आंदोलन राज्यव्यापी आंदोलन करावे, अशी भूमिका मांडली होती दरम्यान, १३ दिवसांच्या उपोषणादरम्यान राहुल पावरा यांची तीन वेळा प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना अन्नसेवन करण्याचा सल्ला दिला. शुक्रवारी आदिवासी सकल विद्यार्थी कृती समितीची तातडीची बैठक घेण्यात आली. उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करून उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीतही या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सायंकाळी सात वाजेला, राहुल पावरा, विवेक गावित,आणि लक्ष्मी जाधव, यांनी लहान मुलांच्या हस्ते लिंबूपाणी स्वीकारून उपोषण सोडले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस आयुक्त संदीप कर्णीक, नाशिक प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत आणि माजी आमदार जे. पी. गावित उपस्थित होते.



