ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी शहरातील विविध रस्त्यांवर सुरू असलेली खोदकामे,……..

नाशिक प्रतिनिधी

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी शहरातील विविध रस्त्यांवर सुरू असलेली खोदकामे, अपूर्ण कामे आणि पावसामुळे निर्माण झालेला चिखल आता नागरिकांच्या जीवावर उठला आहे. नाशिकमध्ये रस्ते की मृत्यूचे सापळे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत असतानाच सातपूर-त्र्यंबकेश्वर रोडवर चिखलामुळे दुचाकी घसरून बसचा धक्का लागल्याने २६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना बुधवारी सकाळी घडली.

 

प्रतिक्षा राजकुमार आवारी इंफाळ (वय २६) असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे, कालच अपघातात दोन नागरिकांचा जीव गेल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एका महिलेचा बळी गेल्याने कुंभकामांसाठी खोदून ठेवलेल्या रस्त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे ८ ते ८.३० वाजेच्या दरम्यान प्रतिक्षा आवारी इंफाळ या पतीसोबत युनिकॉर्न दुचाकी क्रमांक एमएच १५ जीजी १८९२ वरून त्र्यंबकेश्वरच्या दिशेने जात होत्या. सातपूर-त्र्यंबकेश्वर रोडवरील पपया नर्सरीजवळील हॉटेल शौर्य वाड्यासमोर रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे अचानक दुचाकी घसरली.

 

त्याचवेळी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी संदीप फाउंडेशनची बस क्रमांक एमएच १५ एचएच ६०७१ तेथून जात होती. दुचाकी घसरल्याने पती-पत्नी दोघेही रस्त्यावर कोसळले आणि बसचा धक्का लागल्याने प्रतिक्षा गंभीर जखमी झाल्या

 

अपघातानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच प्रतिक्षा आवारी इंफाळ यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र, अनेक ठिकाणी खोदलेले रस्ते, चिखल, खड्डे, अपूर्ण कामे आणि सुरक्षेच्या अभावामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे. दररोज अपघातांच्या घटना घडत असताना प्रशासन आणखी किती बळींची वाट पाहणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

 

घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

 

कुंभमेळ्याच्या कामांचा वेग वाढवताना नागरिकांच्या सुरक्षिततेचा वेग मात्र कमी झाला आहे का?

रस्त्यावरील चिखल आणि अपुऱ्या सुरक्षेमुळे आणखी किती निष्पाप जीव जाणार, असा सवाल आता नाशिककरांकडून उपस्थित होत आहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.