ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

रिंगरोड बाधित शेतकरी महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी;संसार वाचवण्याचे घातले साकडे मुख्यमंत्र्यांची ग्वाही – “एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही;जबरदस्ती केली जाणार नाही!”

नाशिक प्रतिनिधी

नाशिक, दि. २८ ऑगस्ट २०२६ : नाशिक परिक्रमा मार्ग (रिंगरोड),हायवे क्र.१९ तसेच पाथर्डी कचरा डेपो प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज महत्त्वपूर्ण वळण मिळाले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बाधित शेतकरी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी शेतकरी महिलांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधून व औक्षण करून आपल्या कुटुंबांचा संसार,शेती आणि जमिनी वाचविण्यासाठी भावनिक साकडे घातले.

दि. २५ ऑगस्ट रोजी नाशिकहून मुंबईकडे पायी मोर्चा काढण्यात आला होता. मात्र पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी ठिय्या आंदोलन सुरू केले.त्यानंतर दि.२७ ऑगस्ट रोजी नाशिकचे पालकमंत्री ना.गिरीश महाजन नासिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक ग्रामीण अधीक्षक डॉ डी एस स्वामी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत पोलीस उपायुक्त किशोर काळे साहेब पोलीस उपायुक्त किरण चव्हाण यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते.

आज दि.२८ ऑगस्ट रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बैठकीनंतर शेतकरी शिष्टमंडळ व बाधित महिला प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची त्यांच्या दालनात भेट घेतली.यावेळी महिलांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधून, औक्षण करून “आमचा संसार वाचवा,आमच्या जमिनी वाचवा आणि आम्हाला न्याय्य मोबदला द्या,अशी भावनिक मागणी केली.रिंगरोडच्या प्रस्तावित अलाइनमेंटमुळे घरे, शेती,विहिरी,पाणवठे, फळबागा तसेच शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर होणाऱ्या परिणामांची माहिती महिलांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकरी शिष्टमंडळाला स्पष्ट शब्दांत ग्वाही देत सांगितले की, “एकाही रिंगरोड बाधित शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही.कुठल्याही शेतकऱ्यावर जबरदस्ती केली जाणार नाही. सर्वांच्या संमतीने मुंबईत मॅरेथॉन बैठक घेऊन सर्व बाजूंचा विचार केला जाईल आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून चांगला निर्णय घेतला जाईल.”

 

मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकरी व महिलांना मोठा दिलासा मिळाला असून, आता मुंबईत होणाऱ्या संयुक्त बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.येत्या दोन ते तीन दिवसांत मुंबई येथे मॅरेथॉन संयुक्त बैठक घेण्यात यावी,अशी मागणी शेतकरी शिष्टमंडळाने केली आहे.या बैठकीस मुख्यमंत्री, नाशिकचे पालकमंत्री,महसूल मंत्री,सार्वजनिक बांधकाम मंत्री,महसूल विभागाचे सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव,नगररचना विभागाचे सचिव,नाशिकचे जिल्हाधिकारी,महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे (MSRDC) मुख्य कार्यकारी अधिकारी,नाशिक कार्यालयातील संबंधित अधिकारी,सर्व भूसंपादन अधिकारी,मूल्यांकन अधिकारी रितेश चव्हाण तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

रिंगरोडच्या प्रस्तावित अलाइनमेंटमुळे बाधित होणारी घरे,शेती,विहिरी,पाणवठे, फळबागा आणि शेतकऱ्यांचा संसार यांचा सर्वंकष विचार करून अलाइनमेंटमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात याव्यात.शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान होईल, अशा पद्धतीने प्रकल्पाची आखणी करण्यात यावी,अशी मागणी शिष्टमंडळाने केली. तसेच भूसंपादन व मोबदला निश्चितीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवून प्रत्यक्ष बाजारभाव,मागील व्यवहार आणि जमिनीच्या वास्तविक मूल्याचा योग्य विचार करून शेतकऱ्यांना न्याय्य व योग्य मोबदला देण्यात यावा,अशीही मागणी करण्यात आली.

 

या शिष्टमंडळात छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर,किसान सभेचे राजू देसले,सुदाम जाचक,दीपक हागवणे,सुदर्शन पाटील,अक्षय कातड,सागर लोणे तसेच महिला प्रतिनिधी निर्मला जाचक,सुरेखा जाधव,सविता उगले,राधिका पगार,विजया पिंगळे,रूपाली उगले,सुरेखा डांगले यांच्यासह विलास जाधव,महेंद्र पगार,माधवराव उगले,शिवाजी डांगले,रोशन उगले आदी शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही आणि कोणावरही जबरदस्ती केली जाणार नाही,अशी स्पष्ट ग्वाही दिली आहे. त्यांच्या शब्दाचे आम्ही स्वागत करतो आणि विश्वास ठेवतो. आता मुंबईतील प्रस्तावित संयुक्त बैठकीत शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे.मुख्यमंत्री संवेदनशीलपणे शेतकऱ्यांचा प्रश्न समजून घेत आहेत.त्यामुळे पालकमंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस निश्चितपणे शेतकऱ्यांना न्याय देतील,असा आम्हाला विश्वास आहे.मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा,शेतकऱ्यांवर कोणतीही जबरदस्ती करू नये आणि शेतकऱ्यांच्या हिताचा अंतिम निर्णय घ्यावा,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.