आदिवासी विद्यार्थ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनात काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीनिशी सहभागी होणार काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आंदोलनाला जाहीर पाठिंबा
नाशिक : मनिष तिवडे

१ सप्टेंबर रोजी नाशिक येथे होणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनात काँग्रेस पक्ष सहभागी होणार असून
नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर उपोषणास बसलेल्या ‘Gen Z’ आदिवासी विद्यार्थी आंदोलकांची भेट घेतल्यानंतर सपकाळ यांनी ही घोषणा केली होती.
आंदोलनाची पार्श्वभूमी आणि काँग्रेसची भूमिका : १ सप्टेंबरचा ‘उलगुलान’ मोर्चा : राज्यातील विविध आदिवासी विद्यार्थी संघटना एकत्र येत १ सप्टेंबर रोजी नाशिकला आंदोलनाचा केंद्रबिंदू बनवून तीव्र आंदोलन व मोर्चा काढणार आहेत. या आंदोलनात हर्षवर्धन सपकाळ, धुळे लोकसभा खासदार डाॅ. शोभा बच्छाव, जेष्ठ नेते, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध वनकर, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर, काँग्रेस नेते लकी जाधव, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, NSUI चे प्रदेश उपाध्यक्ष समाधान बागुल आदींसह काँग्रेसचे इतर प्रमुख नेते प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत.
सरकारला इशारा : आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने मान्य न केल्यास काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करेल, असा थेट इशारा प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी महायुती सरकारला दिला आहे.
मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी : आदिवासी विभागातील कथित भ्रष्टाचार, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि वसतिगृहातील गैरसोयींची नैतिक जबाबदारी स्वीकारून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
राहुल गांधींचा पाठिंबा : यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ‘छात्रों की गूँज’ कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थिनींशी संवाद साधून या आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे मृत्यू, सेंट्रल किचन योजना बंद करणे, डीबीटी आणि पेसा (PESA) अंतर्गत रखडलेली नोकरभरती यांसारख्या विविध १४ प्रमुख मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे हे आंदोलन गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे.



