आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेशसामाजिक

रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचा शासनाविरोधात एल्गार; २५ ऑगस्टपासून नाशिक-मुंबई पायी मोर्चा चुकीच्या अलायमेंटची नव्याने चौकशी व अंतिम निर्णय होईपर्यंत जमीन खरेदीला असहकार;२८ ऑगस्टला महिला शेतकरी मुख्यमंत्र्यांना राखी बांधून संसार वाचविण्याचे करणार आवाहन

नाशिक प्रतिनिधी

नाशिक,दि.२३ ऑगस्ट २०२६ : नाशिक रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या १४ गावांतील व हायवे नंबर २९ मधील शेतकऱ्यांनी शासनाच्या कथित अन्यायकारक धोरणांविरोधात आता निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार केला असून,२५ ऑगस्टपासून असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली कालिका माता मंदिर,नाशिक-मुंबई नाका येथील सभागृहात झालेल्या बैठकीत नाशिक तालुक्यातील १४ गावांतील व हायवे नंबर २९ चिंचखेड ते दिंडोरी मधील प्रमुख शेतकरी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.रिंग रोडची अलायमेंट,जमिनीचा योग्य मोबदला,जमीन खरेदीची प्रक्रिया तसेच प्रशासनाकडून होत असल्याचा आरोप असलेला दबाव या मुद्द्यांवर शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली.रिंग रोडची अलायमेंट निश्चित करताना मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करत,या प्रक्रियेत सहभागी असलेल्या संबंधित अधिकारी व कंपनीच्या भूमिकेबाबत शेतकऱ्यांनी यापूर्वी शासनासमोर पुरावे सादर केल्याचा दावा केला. संबंधितांवर कारवाई झाली असल्याचा दावा असेल,तर त्याच अलायमेंटच्या आधारे सध्या जिल्हा प्रशासन,प्रांताधिकारी आणि एमएसआयडीसीकडून पुढील जमीन खरेदीची प्रक्रिया कोणत्या आधारावर सुरू आहे,असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.अलायमेंट चुकीची असल्यास तिची नव्याने तपासणी करून आवश्यकतेनुसार अलायमेंट नव्याने निश्चित करावी,अशी मागणी यावेळी करण्यात आली.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त केली असल्याचे सांगत,चौकशी समितीचा अहवाल समोर येईपर्यंत रिंग रोड बाधित १४ गावांमध्ये व हायवे नंबर 29 मधील चिंचखेड ते दिंडोरी या कोणत्याही प्रकारची जमीन खरेदी,मोजणी अथवा पुढील कार्यवाही करू नये,अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.चौकशी सुरू असताना त्याच वादग्रस्त अलायमेंटच्या आधारे प्रक्रिया पुढे नेणे अन्यायकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या जमिनींच्या मोबदल्याबाबत २५ टक्के कपातीची भीती दाखवून दबाव आणला जात असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला.आज खरेदीला आला नाहीत तर २५ टक्के मोबदला मिळणार नाही,अशा स्वरूपाचा दबाव टाकला जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,प्रांताधिकारी तसेच एमएसआयडीसीचे अधिकारी पटांगळे व कोळी यांच्याकडून शेतकऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोपही करण्यात आला.पाथर्डी परिसरातील KYC प्रक्रियेबाबतही संभ्रम निर्माण झाल्याचा दावा करत,प्रश्न सुटेपर्यंत एकही शेतकरी जमीन खरेदी प्रक्रियेला सहकार्य करणार नाही,अशी भूमिका घेण्यात आली.या संदर्भात प्रशासनाने शेतकऱ्यांवर दबाव न आणता प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी,अशी मागणी करण गायकर यांनी केली.

शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानातून मुंबईतील आझाद मैदानाकडे पायी मोर्चा काढण्यात येणार आहे.त्यानंतर २८ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी बाधित शेतकरी महिला मुख्यमंत्र्यांना राखी बांधणार असून,‘लाडका भाऊ’ म्हणून आपल्या जमिनी,घरे,शेती आणि कुटुंबाचा संसार वाचविण्यासाठी भावनिक आवाहन करणार आहेत. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शासनस्तरावर बैठक घेऊन रिंग रोडची अलायमेंट व मोबदल्याबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत १४ गावांतील कोणत्याही शेतकऱ्याची जमीन खरेदी करू नये,तसेच मोबदल्याचा प्रश्न शासनाच्या हमीसह सुटेपर्यंत हायवे क्रमांक २९ मधील चिंचखेड ते जोपुळ परिसरात मोजणी करू नये,अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

रिंग रोडचा प्रश्न हा कोणत्याही विकासकामाच्या विरोधातील नसून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी,जमिनीच्या योग्य व न्याय्य मोबदल्यासाठी, पारदर्शक अलायमेंटसाठी आणि बाधित कुटुंबांचे हित जपण्यासाठीचा लढा असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.शासनाने चौकशी समितीचा अहवाल जाहीर करून अलायमेंटची नव्याने तपासणी करावी आणि अंतिम निर्णय होईपर्यंत जमीन खरेदीची प्रक्रिया स्थगित ठेवावी,अशी मागणी करण्यात आली.
या बैठकीला छावा क्रांतिवीर सेनेचे नवनाथ शिंदे,सुभाष गायकर,प्रवीण पाटील,वैभव दळवी,शुभम देशमुख यांच्यासह नाशिक रिंग रोड व हायवे क्रमांक २९ बाधित परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.