आपला जिल्हाक्राईम स्टोरीताज्या घडामोडी

रिंगरोड बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीपर्यंत कामे स्थगित पालकमंत्री गिरीश महाजन यांचा जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश; २–३ दिवसांत मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसोबत सविस्तर बैठक — शेतकरी महिलांनी पालकमंत्र्यांना बांधल्या राख्या

नाशिक प्रतिनिधी

नाशिक, दि.२७ ऑगस्ट २०२६ : नाशिक परिक्रमा मार्ग (रिंगरोड),हायवे क्र.२९ चिंचखेड ते जोपुळ दिंडोरी तसेच पाथर्डी कचरा डेपो बाधित शेतकऱ्यांच्या गेल्या दोन दिवसांपासून करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या आवारात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला आज महत्त्वपूर्ण वळण मिळाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.यावेळी सुमारे ५०० ते ६०० शेतकरी उपस्थित होते.

२५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधून आपल्या घरदार,शेती आणि संसाराचे रक्षण करण्याचे साकडे घालण्यासाठी शेतकरी मुंबईकडे पायी निघाले होते. मात्र पोलिसांनी मोर्चाला पुढे जाण्यास मज्जाव केल्यानंतर करण गायकर यांना इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे स्थानबद्ध करण्यात आले.त्यानंतर बाधित शेतकरी सहकुटुंब पोलीस स्टेशनच्या आवारात ठिय्या देऊन बसले.मुख्यमंत्री किंवा त्यांच्या प्रतिनिधींकडून ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती.
आंदोलनस्थळी शेतकऱ्यांनी पालकमंत्री महाजन यांच्यासमोर भूसंपादनाच्या मोबदल्यातील तफावत, ग्रामीण भागासाठी गुणांक दोन लागू करणे,फळझाडांच्या मोबदल्याचे कमी दर,एकाच गावात वेगवेगळे दर, रिंगरोडच्या अलाइनमेंटबाबतचे आक्षेप व पुरावे,तसेच प्रकल्पामुळे होणारे सामाजिक व आर्थिक नुकसान याबाबत सविस्तर भूमिका मांडली. हायवे क्र.२९ साठी कोणतेही विना मोबदला भूसंपादन होऊ देणार नसल्याची भूमिकाही शेतकऱ्यांनी स्पष्ट केली.
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीपर्यंत रिंगरोडची कामे स्थगित
आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सविस्तर बैठक होत नाही आणि प्रश्नांवर अंतिम निर्णय होत नाही,तोपर्यंत रिंगरोडसंदर्भातील मोजणी, भूसंपादन,जमीन खरेदी, नोटिसा अथवा शेतकऱ्यांवर परिणाम करणारी कोणतीही पुढील प्रशासकीय कारवाई करू नये,अशी मागणी केली. त्याची दखल घेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळावरूनच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होऊन अंतिम तोडगा निघेपर्यंत रिंगरोडसंदर्भातील पुढील कामे स्थगित ठेवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.तसेच शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देऊ नये आणि बैठकीपूर्वी कोणतीही घाईघाईची कारवाई करू नये,असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री महाजन यांनी सांगितले की,४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांसोबत शेतकऱ्यांची बैठक झाली होती.त्यानंतर सविस्तर बैठक होणे अपेक्षित होते;मात्र जिल्हा प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांना अलाइनमेंट व शेतकऱ्यांचे प्रश्न सुटल्याचे ब्रीफिंग गेल्याने शासन आणि शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण झाले.शासन शेतकऱ्यांच्या सोबत आहे. कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
२–३ दिवसांत मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण स्वतः चर्चा केली असून,२८ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांचा नाशिकमध्ये भरगच्च कार्यक्रम असल्याने त्यादिवशी बैठक शक्य नसली तरी पुढील दोन ते तीन दिवसांत मंत्रालयात सुमारे एक तासाची सविस्तर बैठक घेण्यात येईल,असे महाजन यांनी स्पष्ट केले.या बैठकीस रिंगरोड बाधित शेतकरी प्रतिनिधी,MSIDCचे वरिष्ठ अधिकारी,जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि पालकमंत्री स्वतःउपस्थित राहणार असून अलाइनमेंट,भूसंपादनाचा मोबदला,गुणांक,फळझाडांचे दर आणि इतर सर्व प्रश्नांवर चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले.
दरम्यान,मुख्यमंत्री फडणवीस यांना राखी बांधता न आल्याची खंत व्यक्त करणाऱ्या महिला शेतकऱ्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांनाच रक्षाबंधनानिमित्त राख्या बांधल्या.प्रतिनिधी स्वरूपात चार ते पाच महिला शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वेळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही महाजन यांनी दिले.या महिला मुख्यमंत्र्यांना राखी बांधून “आमचे घरदार,शेती आणि संसार वाचवा,आमच्या मागण्यांवर न्याय्य निर्णय घ्या,” असे साकडे घालणार आहेत.
पालकमंत्र्यांच्या भेटीनंतर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असले तरी मंत्रालयातील बैठकीत सर्व प्रश्नांवर ठोस व न्याय्य निर्णय होणे आवश्यक असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी स्पष्ट केली. आंदोलनाला सहकार्य करणारे पोलीस प्रशासन,पत्रकार बांधव,किसान सभा,मनसे, विविध संघटना यांचे किसान सभेचे सरचिटणीस राजू दिसले यांनी आभार मानले यावेळी या आंदोलनासाठी शेतकरी नेते नाना बच्छाव छावा क्रांतिवीर सेनेचे शिवा तेलंग नवनाथ शिंदे आशिष हिरे प्रवीण पाटील वैभव दळवी शुभम देशमुख आधी उपस्थित होते.

“मुख्यमंत्र्यांसोबत सविस्तर बैठक,प्रश्नांवर ठोस तोडगा आणि शेतकऱ्यांना न्याय हाच आता पुढील मार्ग आहे नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि संबंधित अधिकारी शेतकऱ्यांची दिशाभूल करत हिटलर शाही प्रमाणे जे काम करत आहेत हे काम त्यांनी करू नये मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पुढील बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर योग्य निर्णय घेत न्याय द्यावा हीच अपेक्षा आहे. अधिकाऱ्यांच्या नादी न लागता शेतकरी हिताचा निर्णय घेणे विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असेल.
करण गायकर -संस्थापक अध्यक्ष छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र राज्य

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.