आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा!

नाशिक प्रतिनिधी मनिष तिवडे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या प्रश्नांची जाण असलेल्या कर्तव्यदक्ष मंत्र्याची आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी

 

नाशिक,दि.३सप्टेंबर २०२६ :

मराठा आरक्षणाचा प्रश्न हा महाराष्ट्रातील कोट्यवधी मराठा समाजाच्या भवितव्याशी निगडित असताना सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.याच पार्श्वभूमीवर आज नाशिक जिल्हा सकल मराठा क्रांती मोर्चाची महत्त्वपूर्ण बैठक कालिका मंदिर येथील हॉलमध्ये पार पडली.या बैठकीला शेकडो समाजबांधव उपस्थित होते.बैठकीमध्ये मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून सरकारच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सातत्याने समाजाच्या न्याय्य हक्कासाठी लढत आहोत.मात्र मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्षपद राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वीकारल्यानंतर आजपर्यंत समाजाच्या प्रश्नांवर प्रभावी बैठक का घेतली नाही? मराठा समाजाच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन चर्चा का केली नाही? हे प्रश्न आज महाराष्ट्रातील मराठा समाजाला पडले आहेत.

SEBC अंतर्गत १० टक्के आरक्षण मिळाल्यानंतर त्याचे कायदेशीर संरक्षण,प्रभावी अंमलबजावणी आणि भविष्यातील संरक्षणासाठी सरकारने नेमकी काय ठोस पावले उचलली?आरक्षणाच्या प्रश्नावर न्यायालयीन, प्रशासकीय आणि कायदेशीर बाबींचा पाठपुरावा किती गांभीर्याने सुरू आहे? विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न, शुल्क,वसतिगृह,शिष्यवृत्ती,सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण तसेच मराठा समाजाच्या इतर प्रलंबित मागण्यांबाबत उपसमितीने आजपर्यंत काय निर्णय घेतले? याचा संपूर्ण हिशोब महाराष्ट्रातील मराठा समाजाला देणे ही सरकारची जबाबदारी आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आमचा थेट सवाल आहे—जर मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी आरक्षण उपसमिती स्थापन केली असेल,तर त्या समितीचे कामकाज नेमके कुठपर्यंत पोहोचले आहे?अध्यक्षांकडून आणि समितीतील संबंधित मंत्र्यांकडून कामाचा जाब का घेतला जात नाही?समितीच्या बैठका किती झाल्या,त्यामध्ये कोणते निर्णय झाले आणि त्या निर्णयांची अंमलबजावणी किती झाली,हे समाजासमोर का मांडले जात नाही?

मुख्यमंत्री मराठा समाजाला न्याय देण्याबाबत सकारात्मक असल्याचे सांगत असतील,तर त्यांच्या आश्वासनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली पाहिजे.केवळ समिती स्थापन करून किंवा आश्वासने देऊन समाजाचा प्रश्न सुटणार नाही.समाजाच्या प्रश्नांची जाण नसलेल्या किंवा पदाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडण्यात अपयशी ठरणाऱ्या व्यक्तीकडे एवढी महत्त्वाची जबाबदारी ठेवण्याचे कारण काय,हा सवाल आम्ही मुख्यमंत्री आणि सरकारला करीत आहोत.

त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचा नैतिक जबाबदारीच्या आधारावर राजीनामा घ्यावा आणि त्यांच्या जागी मराठा समाजाच्या प्रश्नांची सखोल जाण असलेल्या,समाजाशी सातत्याने संवाद ठेवणाऱ्या आणि कर्तव्यदक्ष मंत्र्याची मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी,ही आमची स्पष्ट मागणी आहे.उपसमितीतील सर्व संबंधित मंत्र्यांनीही आपली भूमिका स्पष्ट करावी आणि समितीच्या कामकाजाचा संपूर्ण हिशोब समाजासमोर मांडावा.

मराठा समाजाला आता केवळ आश्वासने नकोत;आरक्षणाचे कायदेशीर संरक्षण,प्रभावी अंमलबजावणी आणि समाजाच्या सर्व प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय हवा आहे.आमची लढाई कोणत्याही एका व्यक्तीविरोधात नसून महाराष्ट्रातील तीन कोटी मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी आणि पुढील पिढीच्या भवितव्यासाठी आहे.त्यामुळे सरकारने समाजाच्या संयमाची परीक्षा न पाहता तातडीने ठोस निर्णय घ्यावेत.

या पार्श्वभूमीवर दि.८सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई येथे महाराष्ट्रातील मराठा क्रांती मोर्चाच्या चळवळीत काम करणारे सर्व कार्यकर्ते,समन्वयक आणि पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण निमंत्रित बैठक आयोजित करण्यात येणार आहे.कोणत्याही पक्षात असले तरी ज्यांनी समाजासाठी वेळ दिला आहे,अशा सर्व समाजबांधवांनी या बैठकीला उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात येत आहे.या बैठकीत सरकारला मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जाब विचारणे,आरक्षण उपसमितीच्या कामकाजाचा आढावा घेणे आणि यापुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.

“मुख्यमंत्री महोदय,मराठा समाजाच्या प्रश्नावर आता आश्वासन नको,ठोस निर्णय हवा!राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा घ्या,कर्तव्यदक्ष मंत्र्याची आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करा आणि मराठा समाजाला न्याय द्या;अन्यथा ८ सप्टेंबरच्या मुंबई बैठकीतून पुढील निर्णायक आंदोलनाची दिशा ठरवली जाईल!असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्याचे समन्वयक करण गायकर यांनी आजच्या बैठकीतून दिला…

 

या बैठकीला सकल मराठा क्रांती मोर्चाचे करण गायकर,नानासाहेब बच्छाव,विलास पांगरकर,चंद्रकांत बनकर,अण्णासाहेब पाटील,आशिष हिरे,नवनाथ शिंदे,राजेंद्र शेळके,सुभाष गायकर,योगेश गांगुर्डे,प्रवीण पाटील,योगेश कापसे,रोशन खैरे,वैभव दळवी,हार्दिक निगळ,हर्षल पवार अण्णा पिंपळे,विक्रांत गायधनी,अनिल आहेर,राकेश सोनवणे,रमेश खापरे,बापू खैरनार,ज्ञानेश्वर पालखेडे,राम पाटील, अतुल पांगारकर आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.