मंगळवारी नाशिक शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद
नाशिक प्रतिनिधी

द्वारका सर्कल येथील इंटरचेंजच्या महत्त्वपूर्ण कामासह शहरातील विविध ठिकाणी पाणीपुरवठा विषयक अत्यावश्यक दुरुस्ती व क्रॉस-कनेक्शनची कामे करण्यात येणार असल्याने मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच बुधवार, १९ ऑगस्ट रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याची माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने दिली आहे.
द्वारका सर्कल येथील इंटरचेंजच्या कामासाठी ५०० मिमी व्यासाच्या गुरुत्ववाहिनीचे क्रॉस-कनेक्शन करणे आवश्यक आहे. त्यासाठी तात्पुरता १२ तासांचा शटडाउन घेण्यात येणार आहे. या कालावधीत शहरातील पाणीपुरवठ्याशी संबंधित विविध १७ अत्यावश्यक कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. यामध्ये चढ्ढा पार्क, कल्पतरू नगर, भवानी माता, पवननगर जलकुंभांवरील व्हॉल्व्ह दुरुस्ती, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रातील कामे, विविध ठिकाणी पाइपलाइन गळती दुरुस्ती, क्रॉस-कनेक्शन, नवीन जलकुंभांना पाइपलाइन जोडणी तसेच गांधीनगर ते नाशिकरोड ९०० मिमी गुरुत्ववाहिनीचे वॉशआउट आदी कामांचा समावेश आहे.
द्वारका इंटरचेंजच्या कामाला गती देण्याबरोबरच शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ही कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा आणि मंगळवारच्या पाणीपुरवठा बंदीची नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे, अशी विनंती अधीक्षक अभियंता, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग यांनी केली आहे.



