सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिरात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
नाशिक प्रतिनिधी

नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिरात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
यानंतर शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी तसेच विविध क्रांतिकारकांच्या वेशभूषा साकारल्या. काही विद्यार्थिनी भारतमातेच्या वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ व राष्ट्रगीत सादर करण्यात आले. तसेच ‘बलसागर भारत होवो’, ‘झेंडा उंचा रहे हमारा’ यांसह विविध देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सांगितिक कवायतीचे सुंदर संचलन करून उपस्थितांची दाद मिळवली. अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली पाटील यांनी केले. गीत मंचामध्ये उषा जोपळे, प्रशांत केंदळे आणि गणेश गांगोडे यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले.
हर्षल कोठावदे यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्तीची प्रतिज्ञा दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक राजेंद्र निकम यांनी पर्यावरण रक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी भारताचे जबाबदार नागरिक बनावे, असे आवाहन केले. तसेच सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सारिका भगत, सत्रप्रमुख मनीषा जोशी, नीलिमा गायधनी, सांस्कृतिक प्रमुख प्राजक्ता क्षीरसागर, राहुल चव्हाण, किशोर पारखे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण आणि देशभक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.



