राष्ट्रीय पक्षी मोराला ५० फूट विहिरीतून जीवदान; वन्य पशुप्राणी मित्र भागवत झाल्टे यांच्या धाडसी बचावकार्याला यश
सोमनाथ मानकर

चांदवड तालुक्यातील वडगाव पंगु येथील मळ्यातील सुमारे ५० फूट खोल विहिरीत पडलेल्या राष्ट्रीय पक्षी मोराला वन्य पशुप्राणी मित्र भागवत झाल्टे यांनी धाडसी बचावकार्य करून सुरक्षित जीवदान दिले. या घटनेमुळे परिसरात झाल्टे यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आज (रविवार) सकाळी अशोक धोंडराम मेंगाने हे आपल्या शेतातील विहिरीवर मोटार सुरू करण्यासाठी गेले असता त्यांनी विहिरीतील पाण्याची पाहणी केली. त्यावेळी विहिरीत एक मोर तडफडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी कोणताही विलंब न करता वन्य पशुप्राणी मित्र भागवत झाल्टे यांना याची माहिती दिली.
माहिती मिळताच भागवत झाल्टे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कॅरेट व दोरीच्या साहाय्याने अत्यंत सावधगिरीने सुमारे ५० फूट खोल विहिरीत उतरून त्यांनी मोराला सुरक्षित बाहेर काढले. बाहेर काढल्यानंतर मोराच्या अंगावरील पाणी कोरडे करण्यात आले. त्यावेळी त्याच्या अंगावर विविध ठिकाणी जखमा झाल्याचे तसेच त्वचा लाल झाल्याचे दिसून आले.
यानंतर झाल्टे यांनी येवला वनपरिक्षेत्राचे आरएफओ राहुल घुगे यांना घटनेची माहिती दिली. तसेच वनमजूर भाऊसाहेब झाल्टे यांनाही पाचारण करण्यात आले. पुढील उपचारासाठी जखमी मोर वन विभागाच्या ताब्यात देण्यात आला. वनमजूर भाऊसाहेब झाल्टे यांनी मोर सय्यद भाई शेख यांच्या ताब्यात देऊन वागदडी येथील रोपवाटिकेत हलविले. तेथे प्राथमिक उपचार म्हणून औषध फवारणी करण्यात आली असून पुढील उपचारासाठी शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला.
या बचाव मोहिमेत वन्य पशुप्राणी मित्र भागवत झाल्टे, वनमजूर भाऊसाहेब झाल्टे, भाऊसाहेब गोजरे, वैभव मेंगाने, रोहन मेंगाने तसेच अशोक धोंडराम मेंगाने यांनी मोलाचे सहकार्य केले.
भागवत झाल्टे यांनी यापूर्वीही परिसरातील अनेक मोर, वन्य प्राणी व पाळीव जनावरांचे प्राण वाचविले आहेत. त्यामुळे वन्यजीव अडचणीत सापडल्याची घटना घडली की परिसरातील नागरिकांना सर्वप्रथम भागवत झाल्टे यांचेच नाव आठवते.
चांदवड तालुक्यातील वडगाव पंगु येथे ५० फूट खोल विहिरीत पडलेल्या राष्ट्रीय पक्षी मोराला वन्य पशुप्राणी मित्र भागवत झाल्टे यांनी कॅरेट व दोरीच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर काढून जीवदान दिले. बचावकार्यात सहभागी सहकाऱ्यांसमवेत जखमी मोर.



