आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेश

राहुरी कृषी विद्यापीठ सुरक्षारक्षक हत्याकांडाची सीआयडी चौकशी करा

कावेरी भिगारदिवे

 

शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

कुटुंबाला आर्थिक मदत, नोकरी व दोषींवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाईची मागणी

अन्यथा 12 जूनला महात्मा फुले कृषी विद्यापीठ बंद आंदोलन -विनोद साळवे

अहिल्यानगर – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मागासवर्गीय दलित कुटुंबातील श्रीकांत पोपट दोंदे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेना सामाजिक न्याय विभागाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांची भेट घेऊन निवेदन दिले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे, छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंदराव शेळके, कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार, शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सचिव विजय लोंढे, महिला जिल्हाप्रमुख कावेरी भिंगारदिवे तसेच रमाकांत दोंदे, पोपट दोंदे, शशिकला दोंदे, सहादू दोंदे, बाळासाहेब दोंदे, सिंधुबाई साळवे, तानाजी साळवे, गवराज साळवे, राजेंद्र पाटोळे, ज्योती पाटोळे, किशन कांबळे, कल्याण गायकवाड, मनोज चौहान, विक्रम आल्हाट आदींसह शिवसेना व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेना सामाजिक न्याय विभागाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीकांत दोंदे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. 2 जून 2026 रोजी कर्तव्यावर असताना त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना अत्यंत गंभीर असून यामागील सर्व पैलूंची निष्पक्ष व सखोल चौकशी होणे आवश्‍यक आहे. सध्या सुरू असलेला तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात यावा तसेच या प्रकरणाचा तपास स्वतंत्र आणि निष्पक्ष यंत्रणेमार्फत करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात विद्यापीठ प्रशासनाच्या सुरक्षाविषयक हलगर्जीपणावरही गंभीर प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहेत. श्रीकांत दोंदे ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते, पुरेशी प्रकाशयोजना नव्हती तसेच सुरक्षारक्षकांना स्वतःच्या संरक्षणासाठी किंवा विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी आवश्‍यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले नव्हते. याशिवाय वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांकडून नियमित पाहणी व देखरेखही होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या सर्व निष्काळजीपणामुळेच श्रीकांत दोंदे यांचा जीव गेला असल्याचा आरोप करत सुरक्षा अधिकारी ते संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी, दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांना सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. श्रीकांत दोंदे हे आपल्या कुटुंबाचा प्रमुख आधारस्तंभ होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट कोसळले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी तसेच कुटुंबातील एका पात्र सदस्याला विद्यापीठ अथवा सरकारी सेवेत नोकरी देऊन पुनर्वसन करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचा दावा करत त्यांच्यावर चोरी, खून यांसारखे गंभीर गुन्हे यापूर्वीच दाखल असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात यावी तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (ॲट्रॉसिटी ॲक्ट) गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्यात यावी आणि पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा, महात्मा फुले कृषी विद्यापीठात रोजनदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास शिवसेना आणि आंबेडकरी समाजाच्या वतीने 12 जून रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठात बंद आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे यांनी दिला आहे.

 

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia