नैताळेत मध्यरात्री दरोडेखोरांचा धुमाकूळ; वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून दागिने व रोकड लंपास ; पोलीस उपअधीक्षक कांतीलाल पाटील, पोलीस निरीक्षक गणेश गुरव घटनास्थळी; तपास सुरू
सोमनाथ मानकर

निफाड तालुक्यातील नैताळे येथे आज शुक्रवार दिनांक १२ जून रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एका घरात घुसून वृद्ध दाम्पत्याला मारहाण करत दागिने व रोकड लंपास केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून निफाड पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नैताळे येथील गाजरवाडी रोड परिसरात राहणारे साहेबराव शिवराम तुपलोंढे यांच्या घरात रात्री सुमारे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केला. चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचा कोंडा तोडून स्वयंपाकघराच्या बाजूने घरात प्रवेश केल्याचे सांगितले जाते.
त्या वेळी घरात केवळ साहेबराव तुपलोंढे व त्यांची पत्नी असे दोघेच होते. घरात हालचाल झाल्याचा आवाज आल्याने दाम्पत्याला जाग आली. दरम्यान, चौघांपैकी तिघेजण घरात घुसले होते, तर एक जण बाहेर थांबून पहारा देत होता. अचानक समोर आलेल्या चोरट्यांमुळे दाम्पत्य घाबरले. चोरट्यांनी त्यांना मारहाण करत घरातील सोने-चांदीचे दागिने तसेच रोकड रक्कम हिसकावून नेल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच निफाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक कांतीलाल पाटील, पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच आरोपींचा माग काढण्यासाठी स्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. स्वान पथकाच्या मदतीने परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून विविध पुरावे संकलित केले असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत
पोलिसांनी पंचनामा करून परिसरातील पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.
या धाडसी चोरीच्या घटनेमुळे नैताळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.



