नकाशावरील ‘तुटक रेषा’ अखेर प्रत्यक्षात अवतरली! निफाड महसूल प्रशासनाची मोठी कामगिरीविष्णुनगर-हनुमान नगरचा शिवरस्ता मोकळा
सोमनाथ मानकर

निफाड तालुक्यातील विष्णुनगर ते हनुमान नगर येथील गेल्या १५ वर्षांपासून बंद असलेला सुमारे १७०० फूट लांबीचा आणि १८ फूट रुंदीचा महत्त्वाचा शेतरस्ता (शिवरस्ता) अखेर प्रशासनाच्या यशस्वी मध्यस्थीने आणि लोकसमजुतीने मोकळा करण्यात आला आहे. रस्ता खुला झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा वाहतुकीचा एक मोठा आणि वर्षानुवर्षांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटला असून, सर्व शेतकऱ्यांनी प्रशासनाचे मनापासून आभार मानले आहेत.
अशी झाली ‘सुपर फास्ट’ प्रशासकीय कारवाई:
विष्णुनगर ते हनुमान नगर दरम्यान गाव नकाशामध्ये तुटक रेषेने दाखवलेला हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. शेतीमाल ने-आण करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. हा रस्ता मोकळा करण्यासाठी निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ शशिकांत मंगरूळे आणि तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी आदेश दिले होते.
या कामी उपअधीक्षक भूमी अभिलेख (निफाड) श्री. राजेंद्र भाबड ,लासलगाव सहा पोलीस निरीक्षक दिपक पाटील व महसूल सहायक श्री. शरद घाटगे यांचे विशेष सहकार्य लाभले. आज दिनांक २६/०५/२०२६ रोजी विंचूरचे मंडळ अधिकारी संतोष डुंबरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांना रस्त्याचे कायदेशीर व व्यावहारिक महत्त्व पटवून दिले. त्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी करून तातडीने हद्दीच्या खुणा निश्चित करण्यात आल्या. प्रशासनाचा सकारात्मक दृष्टिकोन आणि गावकऱ्यांच्या समजूतदारपणामुळे कोणत्याही वादाशिवाय लोकसमजुतीने हा १७०० फूट लांबीचा शिवरस्ता पूर्णपणे खुला करण्यात आला.
यांचे लाभले मोलाचे सहकार्य:
हा जुना रस्ता कायदेशीर आणि शांततापूर्ण मार्गाने मोकळा करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी शुभम पाटसकर तसेच स्थानिक शेतकरी बांधवांनी घटनास्थळी उपस्थित राहून चोख सहकार्य केले. महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या या संयुक्त आणि समन्वयवादी भूमिकेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण न होता हा वाद मिटला.



