कांदा उत्पादकांच्या हक्कासाठी लासलगावात रोहित पवारांचे ट्रॅक्टर आंदोलन; सरकारवर कडाडून टीका
सोमनाथ मानकर

लासलगाव:- राज्यात कांद्याचे दर सातत्याने घसरत असल्याने संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठे आंदोलन छेडले. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या ‘शेतकरी एल्गार’ आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा, कमरेला केळीची पाने आणि हातात फलक घेत शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
लासलगाव हे आशियातील सर्वात मोठे कांदा बाजारपेठ केंद्र मानले जाते. त्यामुळेच या आंदोलनासाठी लासलगावची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आंदोलनादरम्यान रोहित पवार स्वतः कांद्याने भरलेला ट्रॅक्टर चालवत बाजार समितीच्या आवारात दाखल झाले. या प्रतीकात्मक आंदोलनाने उपस्थित शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला.
सभेला संबोधित करताना रोहित पवार यांनी सरकारच्या कांदा धोरणावर सडकून टीका केली. ‘शेतकऱ्याचा कांदा पिकवण्याचा खर्च प्रतिकिलो १८ ते २० रुपये येतो. मात्र बाजारात कांद्याला २ ते ३ रुपये भाव मिळत आहे. काही बाजार समित्यांमध्ये बोली देखील लागत नाही. ही परिस्थिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत वेदनादायी आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या १२ रुपये ३५ पैसे प्रति किलो दराने २ लाख टन कांदा खरेदीच्या निर्णयावरही त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. “निवडणुकीपूर्वी सरकार २४ रुपये भाव देण्याच्या घोषणा करते आणि निवडणुकीनंतर १२ रुपये सांगते. हे शेतकऱ्यांवर उपकार आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यात रब्बी हंगामात जवळपास ७० लाख टन कांदा उत्पादन होत असल्याचा दावा करत रोहित पवार यांनी सरकारच्या खरेदी धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘सरकार फक्त २ लाख टन कांदा खरेदी करणार असेल, तर उर्वरित कांद्याचे काय? अशा तुटपुंज्या खरेदीमुळे बाजारभावात कोणताही फरक पडणार नाही’ असा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी नाफेडच्या कामकाजावरही गंभीर आरोप केले. मागील वेळी सरकारने जाहीर केलेल्या २०० रुपयांच्या अनुदानापैकी केवळ ५० रुपये शेतकऱ्यांना मिळाले असून उर्वरित रकमेचा अपहार झाल्याचा दावा त्यांनी करत चौकशीची मागणी केली. धारणगाव खडक येथील शेतकरी विश्वनाथ उशीर यांच्या आत्महत्येचा उल्लेख करत त्यांनी शेतकऱ्यांना टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन केले. ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ अशी ग्वाही त्यांनी दिली.
आंदोलनानंतरही सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा रोहित पवार यांनी दिला. तसेच २६ मे रोजी चांदवड येथे मुंबई – आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला.
या आंदोलनात खा.निलेश लंके, खा.भास्करराव भगरे, माणिकराव शिंदे, जयदत्त होळकर, ललित दरेकर, प्रवीण कदम, , शिवा सुरासे आदींसह विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि हजारो कांदा उत्पादक उपस्थित होते.
कांद्याच्या दरातील घसरणीमुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून लासलगावमधील या ‘शेतकरी एल्गार’ आंदोलनाने राज्य सरकारसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. आता सरकार यावर काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

• आंदोलनातील प्रमुख मागण्या
कांद्याला किमान २२ ते २४ रुपये प्रतिकिलो हमीभाव द्यावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति क्विंटल किमान १५०० रुपये अनुदान द्यावे, कांदा निर्यात धोरण स्थिर ठेवून निर्यातीस प्रोत्साहन द्यावे, नाफेडमार्फत मोठ्या प्रमाणात खरेदी करून बाजारभाव स्थिर करावा
शासनाने थेट बाजार समित्यांमधून कांदा खरेदी करावी.



