सामाजिक बांधिलकीचा आदर्श : विविध उद्योगसमूहांकडून निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयास व पोलीस प्रशासनाला सहकार्य
राहुल वैराळ

निफाड : समाजाप्रती असलेली जबाबदारी जपत प्रशासनाच्या कार्याला बळकटी देण्यासाठी विविध उद्योगसमूह पुढे येत असल्याचे प्रेरणादायी चित्र निफाड येथे पाहायला मिळाले. उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग निफाड कार्यालयासाठी आवश्यक नवीन फर्निचर व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी JVS Comatsco Ind. Pvt. Ltd., Mechwell Ind. Ltd., RRY Infra Pvt. Ltd., Shree Aarya Construction Company तसेच A.S. Packaging या कंपन्यांनी सामाजिक बांधिलकी जपत सहकार्य देऊ केले आहे.
या उपक्रमात ब्राम्हणवाडे (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथील विविध उद्योग समूहांनी आपल्या कंपनीच्या CSR फंडातून स्वयंस्फूर्तीने मदत केली. त्यांच्या या उल्लेखनीय सहकार्याबद्दल निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. कांतीलाल पाटील साहेब यांच्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून संबंधित उद्योगसमूहांच्या व्यवस्थापकीय संचालकांना व प्रतिनिधींना शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
पोलीस प्रशासनाने सर्व सहकार्य करणाऱ्या उद्योगसमूहांचे आभार मानत, “समाजहितासाठी उद्योग क्षेत्राने पुढाकार घेणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. अशा सहकार्यामुळे प्रशासनाचे कार्य अधिक प्रभावीपणे पार पाडता येते,” असे मत व्यक्त केले.
उद्योगसमूह आणि प्रशासन यांच्यातील समन्वयातून समाजहिताचे कार्य अधिक गतिमान होत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. विविध कंपन्यांनी केलेले हे योगदान इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत असून, सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधिक दृढ करणारे आहे.
या कामी सिन्नर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भरत जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राह्मणवाडे गावचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील श्री. कमलाकर मधुकर रामराजे यांचे अनमोल सहकार्य लाभले. उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. कांतीलाल पाटील साहेबांनी त्यांचे विशेष कौतुक करून त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
विशेष म्हणजे, या उद्योगसमूहांनी यापूर्वीही सामाजिक उत्तरदायित्व जपत मागील वर्षी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय, नाशिक यांच्या कार्यालयाच्या सुशोभीकरणासाठी देखील CSR फंड उपलब्ध करून दिला होता. त्या वेळी विशेष पोलीस महानिरीक्षक मा. श्री. दत्तात्रेय कराळे साहेब यांनीही या उद्योगसमूहांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांचा यथोचित सत्कार केला होता. त्यामुळे प्रशासन व उद्योगसमूह यांच्यातील सामाजिक सहकार्याचा आदर्श अधिक अधोरेखित झाला आहे.



