आपला जिल्हाताज्या घडामोडी

ब्राम्हणवाडे गावात इतिहास घडला : नवरीची घोड्यावरून मिरवणूक काढत स्त्री-पुरुष समानतेचा नवा संदेश

राहुल वैराळ

ब्राम्हणवाडे-ग्रामीण भागात आजही अनेक पारंपरिक रूढी आणि प्रथा पाळल्या जात असताना, ब्राम्हणवाडे गावाने सामाजिक परिवर्तनाचा एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. ज्या पद्धतीने पारंपरिकरित्या नवरदेवाची घोड्यावरून मिरवणूक काढली जाते, त्याचप्रमाणे गावात प्रथमच एका नवरीची घोड्यावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या अभिनव उपक्रमामागे मुलीचे वडील सजन कान्हु रामराजे आणि त्यांच्या परिवाराने पुढाकार घेत स्त्री-पुरुष समानतेचा प्रभावी संदेश समाजासमोर ठेवला.

ढोल-ताशांच्या गजरात, उत्साहपूर्ण वातावरणात आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. “मुलगा आणि मुलगी दोघेही समान आहेत” हा विचार प्रत्यक्ष कृतीतून मांडत सजन रामराजे यांनी आपल्या मुलीला उच्च शिक्षण दिले. मुलांप्रमाणेच मुलीलाही समान वागणूक, समान शिक्षण आणि प्रगतीसाठी समान संधी उपलब्ध करून देत रामराजे परिवाराने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

रामराजे कुटुंबाने केवळ शब्दांत नव्हे तर कृतीतून स्त्री सक्षमीकरणाचा संदेश दिला आहे. मुलगा आणि मुलगी यांच्यात कोणताही भेदभाव न करता दोघांनाही समान हक्क आणि समान संधी मिळाल्या पाहिजेत, हा विचार त्यांनी आपल्या कुटुंबातून जपला. त्यामुळे ही मिरवणूक केवळ एक परंपरा मोडणारी घटना नसून समाजाला नवी दिशा देणारा उपक्रम ठरला आहे.

गावातील ज्येष्ठ नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत बदलत्या काळानुसार समाजाने समानतेचा विचार स्वीकारणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तर युवक-युवतींनी हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे सांगत अशा सामाजिक संदेश देणाऱ्या परंपरा पुढेही सुरू राहाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.

स्त्री सक्षमीकरण, समान हक्क आणि सामाजिक समतेचा संदेश देणारी ही मिरवणूक केवळ एक विवाह सोहळा न राहता समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे. ब्राम्हणवाडे गावातील हा उपक्रम इतर गावांसाठीही आदर्श निर्माण करणारा ठरत असून समाजात सकारात्मक बदल घडविण्याची नवी दिशा देत आहे, असे प्रतिपादन गावचे पोलिस पाटील कमलाकर रामराजे यांनी केले.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.