पदभार स्वीकारताच सागर कोते यांचा ‘ॲक्शन मोड’; धारदार चाकूसह दहशत माजवणारा व अंतरराज्यीय मोबाईल चोर सलग दोन कारवायांत जेरबंद
सोमनाथ मानकर

लासलगाव- पोलीस ठाण्यात नुकतेच सहायक पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारलेल्या सागर कोते यांनी रुजू होताच गुन्हेगारांविरोधात धडाकेबाज कारवाईची सुरुवात केली आहे. अवघ्या दोन दिवसांत त्यांनी प्रथम धारदार चाकू घेऊन बाजारतळ परिसरात दहशत माजवणाऱ्या आरोपीला जेरबंद केले, तर त्यानंतर आठवडा बाजारातील गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणाऱ्या अंतरराज्यीय चोरालाही अटक केली. सलग दोन कारवायांमुळे लासलगाव शहरात पोलिसांचा वाढता धाक आणि गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे.
दि.१३ जुलै रोजी बाजारतळ परिसरात आरोपी रिजवान उर्फ बॉक्सरभाई आयुब बागवान, रा.पिंजार गल्ली, लासलगाव याने मद्यधुंद अवस्थेत एका नागरिकास मारहाण करून सुमारे १० इंच लांबीचा धारदार चाकू हातात घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
यापूर्वी दि.१२ जुलै रोजी लासलगावच्या आठवडा बाजारात गर्दीचा फायदा घेत नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या सुरज सलिम सोलंकी, रा.आहिरखेड, जि.इंदौर, मध्यप्रदेश या अंतरराज्यीय आरोपीला पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडून चोरीचा सॅमसंग एस २५ अल्ट्रा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून न्यायालयीन कोठडी मिळविण्यात आली.
या दोन्ही कारवाया नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.डी.एस.स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एम.तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने केल्या.
• लासलगावात ‘कोते पॅटर्न’ची चर्चा
पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांत सलग दोन धडक कारवाया करून सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी गुन्हेगारांविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कायदा मोडणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचा ठोस संदेश गेला असून नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत केले जात आहे.



