डॉ.श्रीकांत आवारे यांच्या पुढाकारातून जनता विद्यालयात सुसज्ज संगणक लॅब
सोमनाथ मानकर

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या उदात्त हेतूने शिरवाडे येथील सरपंच तथा जनता विद्यालय शिरवाडेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत आवारे यांनी शाळेला दोन संगणक भेट देत शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या दूरदृष्टीपूर्ण उपक्रमातून शाळेत सुसज्ज संगणक लॅब उभी राहिली असून, विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे नवे दालन खुले झाले आहे.
आजच्या डिजिटल युगात संगणक शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरांप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, त्यांचे ज्ञान व कौशल्य विकसित व्हावे, यासाठी डॉ. आवारे यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना गावातच संगणकाचे प्राथमिक तसेच प्रगत शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नव्याने उभारण्यात आलेल्या संगणक लॅबचे उद्घाटन डॉ. श्रीकांत आवारे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. आवारे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विकासात्मक कार्याचे मनापासून कौतुक केले.
या प्रसंगी शिवाजी आवारे, ग्रामसेवक सुनील शिंदे, मुख्याध्यापक डी. के. घोटेकर, ज्ञानेश्वर आवारे, बाबासाहेब चितळकर, वैभव कवडे, सजन चितळकर, दत्तात्रय शिंदे, संजय काळे, रविंद्र तनपुरे, विशाल आवारे, किरण आवारे यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. श्रीकांत आवारे यांच्या या प्रेरणादायी योगदानामुळे जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळण्यास मोठी मदत होणार आहे. त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक बांधिलकीमुळे गावातील शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळाली असून, त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



