निफाड तालुक्यात असाध्य आजार बरे करणारे अजब धन्वंतरी; अंनिसच्या कारवाईनंतर गाशा गुंडाळला
सोमनाथ मानकर

शिरवाडे वाकद :- धारणगाव येथील महेशगिरी प्रकरण ताजे असतानाच निफाड तालुक्यात आणखी एका भोंदूबाबाचा पर्दाफाश झाला आहे. कॅन्सरसारख्या असाध्य आजारांवर दैवी उपचार आणि मंतरलेल्या पाण्याद्वारे रोगमुक्तीचा दावा करणाऱ्या संबंधित बाबाविरुद्ध महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने निफाडचे पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांचेकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
तालुक्यातील एक अजब धन्वंतरी कॅन्सर, मधुमेह, हृदयरोग यांसारख्या गंभीर आजारांवर दैवी उपाय आणि मंतरलेल्या पाण्याद्वारे उपचार करत असल्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याचा आरोप अंनिसने केला आहे. या संदर्भात बाबाच्या सहकाऱ्याशी अंनिसने संपर्क साधला असता, अशा प्रकारचे उपचार केले जात असल्याची कबुली त्याने दिली. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, नाशिक शहर कार्याध्यक्ष कोमल दीपक वर्दे, राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे आणि डॉ. उत्तम डेर्ले यांनी निफाड पोलिस ठाणे गाठत जादूटोणाविरोधी कायद्यानुसार संबंधित बाबा व त्यांना सहकार्य करणाऱ्या व्यक्तींना पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी करावी, भविष्यात असे प्रकार करणार नसल्याचा माफीनामा लिहून घ्यावा आणि आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, अशी निवेदनाद्वारे मागणी केली. अंनिसच्या या कारवाईनंतर संबंधित बाबाने आपले फलक आणि जाहिराती काढून टाकल्याची चर्चा आहे.
° धारणगाव येथील महेशगिरी उर्फ महेश काकडे प्रकरणानंतरही निफाड तालुक्यात अशा प्रकारची भोंदूगिरी सुरू असल्याचे समोर येणे अत्यंत गंभीर आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेत असाध्य आजार बरे करण्याचे खोटे दावे करून त्यांची दिशाभूल केली जात आहे. कोणतीही वैद्यकीय समस्या असल्यास केवळ तज्ज्ञ डॉक्टरांचाच सल्ला घ्यावा. चमत्कार, गंडेदोरे, झाडफूक किंवा असाध्य आजार बरे करण्याच्या खोट्या दाव्यांना नागरिकांनी बळी पडू नये.
– कृष्णाजी चांदगुडे,
राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)



