ताज्या घडामोडी

खानगांव नजिक व उगांव खरेदी-विक्री केंद्रांवर बुधवारपासून द्राक्षेमणी लिलाव सुरू

सोमनाथ मानकर लासलगाव 

खानगांव नजिक व उगांव परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या सोईसाठी यंदाही लासलगाव बाजार समितीच्या खानगांव नजिक व उगांव येथील तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रांवर बुधवार (दि. १८ फेब्रुवारी) पासून द्राक्षेमणी शेतीमालाच्या लिलावास सुरुवात होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर (डीके) जगताप यांनी दिली.

खानगांव नजिक व उगांवसह परिसरातील नांदगांव, डोंगरगांव, रूई, धानोरे, कोळगांव, खेडलेझुंगे, धारणगांव वीर, धारणगांव खडक, नांदुरमध्यमेश्वर, गाजरवाडी, नैताळे, सोनेवाडी, श्रीरामनगर, शिवरे, शिवडी, खेडे, वनसगांव, नांदुर्डी, कुंदेवाडी, खडक माळेगांव, सारोळे खुर्द, रानवड आदी गावांमध्ये द्राक्ष लागवड मोठ्या प्रमाणावर असल्याने शेतकऱ्यांना मालविक्रीची सोय जवळच उपलब्ध व्हावी यासाठी दरवर्षीप्रमाणे उगांव, खानगांव नजिक, नैताळे व मानोरी खुर्द येथे द्राक्षेमणी खरेदी-विक्री केंद्र सुरू करण्यात येते.

सदर केंद्रांना शेतकरी व व्यापारी बांधवांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने यावर्षी खानगांव नजिक व उगांव केंद्रांवर बुधवार (दि. १८ फेब्रुवारी) पासून दररोज दुपारी ०४.०० वा. द्राक्षेमणी लिलाव सुरू करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आपला द्राक्षेमणी शेतीमाल योग्य प्रतवारी करून विक्रीसाठी आणावा. वजनमापनानंतर तात्काळ रोख देयकाची व्यवस्था बाजार समितीकडून करण्यात आली असून स्पर्धात्मक बाजारभावामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळणार आहे.

बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात विनापरवाना शिवार खरेदी करणाऱ्या द्राक्षेमणी खरेदीदारांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सभापती ज्ञानेश्वर (डीके) जगताप, उपसभापती संदीप (ललीत) दरेकर व सदस्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, खानगांव नजिक व उगांव येथील तात्पुरत्या केंद्रांवर द्राक्षेमणी खरेदीस इच्छुक नव्या व्यापाऱ्यांनी परवान्यासाठी आवश्यक अटी-शर्ती पूर्ण करून लासलगाव येथील मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बुधवार, दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी खानगांव नजिक खरेदी-विक्री केंद्रावर दुपारी ०४.०० वा. व उगांव केंद्रावर दुपारी ०५.०० वा. होणाऱ्या लिलाव शुभारंभ कार्यक्रमास विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांचे व ग्रामपंचायतींचे सदस्य, द्राक्ष उत्पादक शेतकरी, अडते, व्यापारी, कामगार व संबंधित घटकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी केले आहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.