
भाटगाव – जिल्हा परिषद शाळा भाटगाव
केंद्र – भोयेगाव ता.चांदवड आजच्या या अतिजलद युगात जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात क्षणात पोहचता येते, तसेच आपला संदेश काही क्षणात कुठल्याही देशात नाही तर दुसऱ्या ग्रहावर देखील पाठवता येतो. अशा या गतिमान संगणकाच्या युगात आपले पारंपरिक पत्र मात्र हरवले, किंबहुना नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आजच्या पिढीला पत्रव्यवहार काय ते देखील व्हिडिओ किंवा चित्राच्या स्वरूपात दाखवावा लागतो. अशात इ. चौथी मधील दळणवळण आणि संदेशवहन हा पाठ शिकवताना संदेशवहनाचे जुने साधन म्हणजे पत्राचा उल्लेख आला. पाठ शिकवत असताना विद्यार्थ्यांना पत्र म्हणजे काय, त्याचा वापर कसा केला जायचा हे कितीपण तोंडी समजावून सांगितले तरी विद्यार्थ्यांच्या पचनी पडत नवते. अशात विद्यार्थ्यांना मुर्त स्वरूपात पत्रव्यवहार घडवून आणण्याची कल्पना मनात आली आणि त्वरित गावातील पोस्ट ऑफिस गाठून इ.४थी आणि ३री च्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन पत्र घेतली. पत्राचा मजकूर कसा असतो, मायना म्हणजे काय, पत्ता म्हणे काय ह्या सर्व बाबी सविस्तर समजावून सांगितल्यावर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या नातेवाईक, मित्र तसेच शिक्षकांना पत्र लिहिण्यास सांगितले. तुम्ही लिहिलेले पत्र तुमच्या आवडत्या व्यक्तींना नक्कीच पोहचेल ही हमी दिल्यावर विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पत्र लिहून आपापले संदेश आपल्या प्रियजनांना पाठवले.. सर्व पत्र एकत्रित करून प्रत्यक्षरित्या पोस्टातील पेटीत टाकताना विद्यार्थ्यांनी एक आगळावेगळा अनुभव घेतला. आणि हसतमुखाने विद्यार्थी शाळेत परतले. ह्या उपक्रमात आमच्या शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती.स्मिता पाटील मॅडम आणि शिक्षक श्री.अजित गवळी सरांनी सहकार्य केले. तसेच व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.रवींद्र पोटे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
तसेच भोयेगाव केंद्राच्या आदरणीय केंद्रप्रमुख महोदया श्रीम.सुनंदा जाधव मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.



