साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ सप्तशृंगी गड या ठिकाणी परतीच्या पावसाचा फटका
सोमनाथ मानकर

सप्तशृंगी गड –साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड या ठिकाणी नवरात्र उत्सव सुरू असून लाखोच्या संख्येने भाविक येत असतात परंतु या पावसाचा फटका सप्तशृंगी गडावरील भाविक व ग्रामस्थ यांना अनुभवास मिळाला शनिवारी सायंकाळी अचानक सुरू झालेल्या पावसाने रविवारी दिवसभर पडत राहिल्याने भाविकांचे लहान मुलांचे आणि वयस्कर व्यक्तींचे खूप हाल झाले तसेच या ठिकाणी असलेले जे व्यवसायीक आहे त्यांचे सुद्धा खूप नुकसान झाले आहे सर्वदूर धुव्वादार बसलेल्या पावसाने चांगलीच धांदल उडाली. सप्तशृंगगडावर रात्रभर पावसाचा जलाभिषेक सुरू राहिला. रविवारी (ता. २८) सुट्टीचा वार असताना देखील अपेक्षेप्रमाणे देवी दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली नाही. या पावसाचा फटका भाविकांसह लहान मोठ्या व्यावसायिकांनाही बसला. पावसामुळे बाजारपेठेत काही प्रमाणात शांतता दिसून आली. रविवार हा सुट्टीचा वार असल्यामुळे भविकांच्या संभाव्य गर्दीचा अंदाज बांधून जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाने ट्रस्ट प्रशासन, महसूल प्रशासन, पोलिस प्रशासनाच्या वतीने बॅरिकेटिंग व रेलिंगचे नियोजन करण्यात आले होते. मात्र पावसाने सर्व नियोजन बिघडवले.

रविवारी (ता. २८) रोजी पावसाच्या उपस्थितीत षष्टीला सुरूवात झाली. ट्रस्ट मुख्य कार्यालयातून निघालेल्या अलंकार मिरवणुकीत ट्रस्टचे माजी अध्यक्ष तथा न्यायाधीश बी.व्ही. वाघ हे सपत्नीक सहभागी झाले होते. रविवार (ता. २८) रोजीची पंचामृत महापूजा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व नाशिक जिल्हा पालक न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी सपत्नीक महापूजा केली. यावेळी भगवतीस लाल रंगाची भरजरीचे पैठणी नेसविण्यात आली होती. सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभय लाहोटी, तहसीलदार रोहिदास वारुळे, ट्रस्टचे विश्वस्त अॅड. ललित निकम, मनज्योत पाटील, व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सहाय्यक मंदिर विभाग प्रमुख विश्वनाथ बर्डे, मंदिर पर्यवेक्षक सुनिल कासार उपस्थित होते. तत्पूर्वी शनिवारी (ता. २७) रोजी सायंकाळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी सपत्नीक देवीचे दर्शन घेतले. यासह रविवारी (ता. २८) रोजी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष तथा न्यायमूर्ती रणजीत मोरे यांनी सपत्नीक देवीचे दर्शन घेतले.



