सर्व मागण्या मान्य, सरकार मनोज जरांगें पुढे झुकले, मराठ्यांचा आझाद मैदानावर विजयी जल्लोष …
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव– श्री.मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा करत राज्य सरकार समोरची लढाई विजयात रूपांतरित झाल्याचा दावा केला. सरकारने जवळपास सर्व मागण्या मान्य केल्याची माहिती स्वतः जरांगे पाटील यांनी व्यासपीठावरून दिली. व्यासपीठावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सह अनेक नेते यावेळी उपस्थित होते. *सरकारने मान्य केलेल्या मागण्या..*
१) हैदराबाद गॅजेटची तात्काळ अंमलबजावणी करणार, शासन आदेश लवकरच जाहीर होणार २)सातारा संस्थान गॅझेट पंधरा दिवसात कायदेशीर तपासणी करून अंमलबजावणी करणार
३) मराठा आंदोलकांवरील गुन्हे सप्टेंबर अखेरपर्यंत मागे घेण्याचा शासन निर्णय
४) आरक्षण आंदोलनात बळी गेलेल्या कुटुंबांना आर्थिक साह्य, शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीत बदल करणार
५) 58 लाख कुणबी नोंदणी ग्रामपंचायत मध्ये लावणार,प्रमाणपत्रावरील अडथळे दूर करण्याचा शासन आदेश पारित. याशिवाय तालुका स्तरावर वंशावळ समित्या, शिंदे समितीला कार्यालय, मोडी लिपी तज्ञ नेमणूक तसेच “मराठा कुणबी एकच” या निर्णयाक जीआर साठी सरकारला दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. आपल्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. आता या निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. सरकारने मनोज जरांगे मराठा आंदोलक यांच्या पुढे झुकून घेतलेल्या निर्णयामुळे मराठा समाजाच्या लढ्याला नवे बळ मिळाले आहे. या विजयी घोषणेनंतर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याने निर्णायक टप्पा गाठल्याचे स्पष्ट झाले, असून पुढील दोन महिने सरकार साठी कसोटीचे ठरणार आहेत.



