नाशिक खोदकामाच्या नावाखाली बनावट सोन्याची फसवणूकआंतरराज्यीय टोळी जामखेड पोलिसांच्या जाळ्यात
प्रतिनिधी सुनील घाडगे

नाशिक येथे खोदकाम करताना सोन्याचे मणी सापडल्याचा बनाव रचत कापड व्यापाऱ्याची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला जामखेड पोलिसांनी प्रसंगावधान राखत जेरबंद केले. खर्डा रोड परिसरात सापळा रचून केलेल्या या कारवाईमुळे लाखोंच्या फसवणुकीचा डाव उधळून लागला आहे.
जामखेड शहरातील प्रसिद्ध कापड व्यावसायिक गणेश महादेव खेत्रे यांच्या क्रिएटिव्ह मेन्स वेअर या दुकानात दि. 28 नोव्हेंबर 2025 रोजी राजस्थान राज्यातील अशोक मिस्त्री ऊर्फ उत्तमकुमार मोकाराम बागरी (वय 24) व मोहनलाल बालाजी बागरी (वय 56) यांनी कपड्यांची खरेदी केली. यावेळी त्यांनी पिवळ्या धातूच्या माळेतील एक मणी दाखवत नाशिक येथे खोदकाम करताना सोन्याचे मणी मिळाल्याचा दावा केला. पैशांची गरज असल्याने सर्व मणी अवघ्या आठ लाख रुपयांत विकण्याचा प्रस्ताव त्यांनी खेत्रे यांना दिला.
मात्र हा व्यवहार संशयास्पद वाटल्याने खेत्रे यांनी तात्काळ जामखेड पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर आरोपी सातत्याने मोबाईलवर संपर्क साधत बनावट सोन्याची विक्री करण्याचा आग्रह धरत होते. अखेर दि. 15 डिसेंबर रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास जामखेड–खर्डा रोडवरील रंगोली हॉटेलजवळ व्यवहार ठरवण्यात आला.
दरम्यान, बनावट सोन्याची विक्री करून फसवणूक होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या आदेशानुसार जामखेड पोलीस पथक खर्डा रोड परिसरात पेट्रोलिंगसाठी तैनात करण्यात आले. व्यवहाराच्या वेळी आरोपींनी फिर्यादीकडून पैसे मागितले असता दागिने बनावट असल्याचे उघड होताच आरोपींनी फिर्यादीस मारहाण करून त्यांच्या खिशातील तीन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
यावेळी झालेल्या आरडाओरडीत पेट्रोलिंगवर असलेले पोलीस नाईक वाघ, पोलीस कॉन्स्टेबल देवा पळसे, घोळवे व शेवाळे यांनी तात्काळ हस्तक्षेप करत दोन आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत तिसरा आरोपी खर्डा बसस्थानकात थांबल्याचे समजताच त्यालाही अटक करण्यात आली.
आरोपींच्या अंगझडतीत फिर्यादीकडून काढून घेतलेली तीन हजार रुपयांची रोख रक्कम तसेच सुमारे एक किलो वजनाच्या पिवळ्या धातूच्या बनावट सोन्याच्या माळा हस्तगत करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव करीत आहेत.
जामखेड पोलिसांच्या या धाडसी व तत्पर कारवाईमुळे व्यापारी वर्गात दिलासा मिळाला असून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.



