लाल कांद्याचे दर टिकवण्यासाठी लासलगाव बाजार समितीचा पुढाकार; रेल्वे महाप्रबंधकांकडे ‘रॅक’ची मागणी : बाजार समिती सभापती जगताप

लासलगाव
आशिया खंडातील कांद्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याची आवक आता पूर्णपणे संपुष्टात आली असून, बाजार आवारात नवीन लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली आहे. मात्र, लाल कांद्याची आवक वाढल्यामुळे दररोज बाजारभावात मोठी चढ-उतार पाहायला मिळत असून, यामुळे उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. उन्हाळ कांद्याप्रमाणे लाल कांद्याचे दर कोसळू नयेत आणि शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी बाजार समितीचे सभापती डी. के. जगताप यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.
देशांतर्गत बाजारपेठेत नाशिकच्या लाल कांद्याला मोठी मागणी असते, परंतु हा कांदा लवकर खराब होत असल्याने त्याची वेळेवर वाहतूक होणे अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रातील कांदा परराज्यातील बाजारपेठांमध्ये जलदगतीने पोहोचल्यास स्थानिक बाजारपेठेतील आवकेचा दबाव कमी होऊन भाव स्थिर राहण्यास मदत होऊ शकते. हीच बाब लक्षात घेऊन सभापती ज्ञानेश्वर जगताप यांनी नुकतीच मुंबई येथे मध्य रेल्वेचे महाप्रबंधक (जी.एम.) विवेक गुप्ता यांची भेट घेतली. यावेळी जगताप यांनी गुप्ता यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि कांदा वाहतुकीसाठी रेल्वेच्या मालगाड्या (रॅक) तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा केली.
सध्या रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वेद्वारे कांदा पाठवणे अधिक सोयीचे आणि फायदेशीर ठरत असल्याने, जास्तीत जास्त रॅक उपलब्ध झाल्यास कांदा मोठ्या प्रमाणावर परराज्यात पाठवता येईल. यामुळे व्यापाऱ्यांना मालाची उचल करणे सोपे होईल आणि परिणामी शेतकऱ्यांना अधिकचा बाजारभाव मिळू शकेल, असा विश्वास बाजार समिती प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने या मागणीवर सकारात्मक विचार करावा, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली असून, या भेटीमुळे आता लाल कांद्याच्या वाहतुकीला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



