नाशिक रिंगरोड बाधित शेतकऱ्यांची उद्या ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांसोबत तातडीची बैठक; आत्मदहन आंदोलन स्थगित पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने निर्णय; शेतकऱ्यांच्या मागण्यांवर पुराव्यानिशी चर्चा होणार – करण गायकर
नाशिक प्रतिनिधी

नाशिक : नाशिक रिंगरोड बाधित शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि भूसंपादनातील गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उद्या,दि.३ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई येथील ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने हा निर्णय झाल्याने उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणारे आत्मदहन आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आल्याची घोषणा शेतकरी प्रतिनिधींनी केली.
आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत रिंगरोड बाधित शेतकऱ्यांची आढावा बैठक पार पडली.यावेळी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर व आमदार देवयानी फरांदे आणि शेतकरी प्रतिनिधींनी भूसंपादन प्रक्रियेतील अनियमितता,प्रशासनाकडून होत असलेली दिशाभूल आणि शेतकऱ्यांवर लादले जाणारे एकतर्फी निर्णय याबाबत पुराव्यांसह वस्तुस्थिती मांडली.रिंगरोडच्या अलाइनमेंटबाबत अद्याप ठोस निर्णय नसणे,जिरायती व बागायती जमिनींचे योग्य मूल्यांकन न करणे,मंजूर दर परस्पर कमी करणे तसेच विविध आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करणे,या मुद्द्यांवर बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
शेतकऱ्यांनी मांडलेल्या प्रश्नांची गंभीरता लक्षात घेऊन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तत्काळ मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत संपूर्ण वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली.त्यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी मुंबईत तातडीची बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.
या बैठकीस विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,कुंभमेळा आयुक्त,पोलीस आयुक्त,ग्रामीण पोलीस अधीक्षक,संबंधित सातही तालुक्यांचे प्रांताधिकारी तसेच एमएसआयडीसी,नगररचना, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे व पुराव्यांसह उपस्थित राहावे,असे निर्देश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय होऊन न्याय मिळेल,असा विश्वास निर्माण झाल्याने आत्मदहन आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मात्र,केवळ आश्वासनांवर समाधान न मानता प्रत्यक्ष निर्णय आणि त्याची अंमलबजावणी महत्त्वाची असल्याची भूमिका शेतकरी प्रतिनिधींनी स्पष्ट केली.उद्याच्या बैठकीनंतरच आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येणार असल्याचे करण गायकर यांनी सांगितले.
या बैठकीस आमदार देवयानी फरांदे छावा क्रांतीवीर सेना संस्थापक अध्यक्ष करण गायकर नगरसेवक सुधाकर बडगुजर नगरसेवक चंद्रकांत नगरसेवक विश्वास नागरे माजी नगरसेवक जगदीश पाटील शेतकरी प्रतिनिधी दीपक हगवणे,सुदर्शन पाटील,पंकज खताळे, सुदाम भावले,रवी पेखळे,सागर लोणे,प्रवीण पाटील,वैभव दळवी विनायक ढेमसे यांच्यासह प्रत्येक गावातील दोन प्रतिनिधी शेतकरी उपस्थित होते.



