मोसिन सय्यद यांची विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड. अहिल्यानगर जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी; सोलापूरच्या विभागीय स्पर्धेत खेळणार.
अहिल्यानगर जिल्हा संपादक कावेरी भिंगारदिवे

अहिल्यानगर तालुक्यातील वाटेफळ येथील कादर सय्यद सर यांचे नातू तथा मुनावर सय्यद यांचे सुपुत्र मोसिन सय्यद यांनी शालेय क्रिकेट स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. अहिल्यानगर येथे नुकत्याच पार पडलेल्या १७ वर्षांखालील मुलांच्या महानगर जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत रेसिडेन्शियल हायस्कूल, अहिल्यानगरच्या संघाने विजेतेपद पटकावले.
या विजयी संघातून खेळताना इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या मोसिन सय्यद यांनी उपकर्णधाराची जबाबदारी सांभाळत उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे संघाच्या विजयात मोलाची भर पडली. निर्णायक सामन्यातील त्यांच्या कामगिरीचे क्रीडा वर्तुळातून विशेष कौतुक होत आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धेत मिळविलेल्या या दिमाखदार विजयामुळे रेसिडेन्शियल हायस्कूलच्या संघाची आगामी विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली असून ही स्पर्धा सोलापूर येथे होणार आहे. त्यामुळे मोसिन सय्यद यांना विभागीय स्तरावर आपल्या क्रिकेट कौशल्याची छाप पाडण्याची संधी मिळाली आहे.
मोसिम यांच्या क्रिकेटमधील प्रगतीसाठी शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर, क्रीडा शिक्षक नारळे सर व गावडे सर, तसेच गोलंदाजी प्रशिक्षक इमरान सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल वाटेफळ, नगर तालुका तसेच क्रीडा क्षेत्रातून मोसिन सय्यद यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असताना पोलिस टाईम्स न्युज24/7 अहिल्यानगर जिल्हा संपादक कावेरी भिंगारदिवे व जिल्हा प्रतिनिधी संजय शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला, त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



