पत्रकारांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर व पत्रकारांच्या प्रलंबित मागण्यां संदर्भात राज्य सरकारकडे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. नरहरी झिरवाळ मांडणार भूमिका !”

“लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांवर होणारे हल्ले ही चिंताजनक बाब आहे. जिवाची बाजी लावून बातम्या देणारा पत्रकार आज सुरक्षित आहे का हा प्रश्न आहे , तर दुसरीकडे पेन्शन, टोला माफी, आरोग्य विमा आणि हक्काच्या घरासारख्या मूलभूत मागण्यांसाठी त्यांना लढावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ’ आणि ‘आंदोलन कृती समिती’च्या वतीने आक्रमक भूमिका घेण्यात आली असून, नुकतीच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नरहरी झिरवाळ यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे.”
“वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि डिजिटल न्यूज पोर्टलवर अहोरात्र काम करणाऱ्या पत्रकारांना अनेक आर्थिक आणि सामाजिक समस्यांचा सामना करावा लागतोय. पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, पत्रकारांवर होणारे खोटे गुन्हे मागे घ्यावेत, ज्येष्ठ पत्रकारांची बाळशास्त्री जांभेकर पेन्शन योजना सुलभ करून १५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, तसेच डिजिटल मीडिया आणि फ्रीलान्स पत्रकारांना अधिकृत मान्यता मिळण्यासह मोफत आरोग्य विमा संरक्षण द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी हा एल्गार पुकारण्यात आला आहे.”
“या सर्व गंभीर प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने पत्रकारांच्या प्रश्नांकडे नेहमी सकारात्मक भूमिकेतून बघणारे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार. नरहरी झिरवाळ यांची राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रीय महासचिव रमेश देसाई, प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील यांच्या उपस्थितीत भेट घेऊन चर्चा केली. यावेळी पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न असो किंवा मजीठिया वेजबोर्डची अंमलबजावणी, प्रत्येक मुद्द्यावर सखोल चर्चा करण्यात आली.
“जर राज्य सरकारने पत्रकारांच्या या मागण्यांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर येत्या काळात हा लढा आणखी तीव्र केला जाईल, असा इशारा पत्रकार संघातर्फे देण्यात आला आहे.
“पत्रकार सुरक्षित तरच लोकशाही सुरक्षित! पत्रकार सरंक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी, पत्रकार विमा व पत्रकार पेन्शनची हमी! याच ज्वलंत प्रश्नांवर आता राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाने राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून, मंत्री ना. नरहरी झिरवाळ यांची भेट घेत धडक मागण्या मांडल्या आहेत. डिजिटल पत्रकारांना मान्यता, विमा आणि हक्काच्या घरासाठी आता विडा उचललाय.



