पावसामुळे चिखलमय झालेला सप्तश्रृंगी गडाचा रस्ता माजी उपसरपंच संदीप बेणके यांनी स्वखर्चाने केला स्वच्छ
सोमनाथ मानकर

सप्तश्रृंगीगड – साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड या ठिकाणी होत असलेल्या सततच्या पावसामुळे सप्तश्रृंगी गडावरील रस्ते चिखलमय झाले होते. त्यामुळे आई सप्तश्रृंगीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना चिखलातून पायपीट करावी लागत होती. लहान मुले, वृद्ध आणि महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.
ही परिस्थिती पाहून गडावरील माजी उपसरपंच संदीप भाऊ बेणके यांनी तातडीने पुढाकार घेतला. त्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून रस्त्यावरील साचलेला चिखल पाण्याने धुऊन साफ केला.
बेणके यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने रस्त्यावर पाणी मारून चिखल बाजूला केला. त्यामुळे भाविकांना आता सुखकर आणि सुरक्षित दर्शन घेता येत आहे.
बेणके यांच्या या सामाजिक कार्याचे भाविक आणि ग्रामस्थांनी कौतुक केले आहे. “पावसाळ्यात दरवर्षी ही समस्या असते. पण संदीप भाऊंनी वेळीच लक्ष घालून रस्ता स्वच्छ केला. त्यामुळे आम्हाला दर्शनाला येणे सोपे झाले” अशी प्रतिक्रिया हरीशभाई पटेल सुरत या भाविकाने दिली.
यावेळी बोलताना संदीप बेणके म्हणाले, “सप्तश्रृंगी हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. लाखो भाविक येथे दर्शनाला येतात. पावसाळ्यात रस्त्यावर कायमस्वरूपी कांक्रिटिकरण आणि पाणी निचऱ्याची व्यवस्था व्हावी यासाठी मी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे.”



