तीन महिने झाले, तरी ७६ वर्षीय महिलेचे एन सी एम सी कार्ड मिळेना; लासलगाव एसटी आगारात सात – आठ हेलपाटे, ज्येष्ठ नागरिकांशी गैरवर्तनाचा आरोप
सोमनाथ मानकर

लासलगाव:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सवलतीच्या प्रवासासाठी एन सी एम सी प्रणाली लागू केली असून, दिनांक १ ऑगस्ट २०२६ पासून सवलतीच्या तिकिटासाठी हे कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, लासलगाव आगारातील एन सी एम सी कार्ड केंद्राच्या कारभाराचा एका ७६ वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या कुटुंबाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याची तक्रार समोर आली आहे.
दिनांक १५ मे रोजी कार्डासाठी प्रक्रिया पूर्ण करूनही तीन महिने उलटत आले तरी कार्ड मिळाले नसून, संबंधित केंद्रात महिलेने चार – पाच वेळा, मुलाने दोन वेळा फेऱ्या मारूनही कार्ड मिळाले नाही.
शिरवाडे येथील जनाबाई आवारे या ७६ वर्षीय महिलेने लासलगाव बस आगारातील एन सी एम सी केंद्रावर दिनांक १५ मे रोजी कार्ड काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कार्ड मिळणे अपेक्षित होते. मात्र, तीन महिने उलटूनही कार्ड हातात पडले नाही. कार्ड केंद्रातूनच गहाळ झाल्याचे सांगण्यात आले. कार्ड मिळवण्यासाठी संबंधित ज्येष्ठ महिलेने तब्बल चार – पाच वेळा आगारात हेलपाटे मारले. वृद्ध आईला वारंवार आगारात जाणे शक्य नसल्याने तिच्या मुलानेही दोन वेळा केंद्रावर जाऊन चौकशी केली. त्यानंतर नातवालाही कार्डाबाबत पाठपुरावा करण्यासाठी पाठवण्यात आले. अशा प्रकारे कुटुंबीयांच्या सात – आठ फेऱ्या होऊनही अद्याप कार्डाचा ठावठिकाणा लागला नाही. कार्ड काढण्यासाठी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ग्राहकाच्या नावावर कार्ड तयार झाले आहे की नाही, ते केंद्रात आले आहे की नाही, हरवले असल्यास त्यावर पुढील कार्यवाही काय, याबाबत स्पष्ट माहिती मिळत नाही. ज्येष्ठ नागरिकाला वारंवार आगारात बोलावण्याऐवजी केंद्राकडे उपलब्ध असलेल्या नोंदी तपासून प्रश्न मार्गी लावणे अपेक्षित आहे.
कार्डाच्या विलंबाबरोबरच संबंधित केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबाबतही अनेक तक्रारी आहेत. केंद्र चालक ज्येष्ठ नागरिकांशी व्यवस्थित बोलत नसून अरेरावीच्या भाषेत बोलत असल्याचा अनुभव अनेक ज्येष्ठ नागरिकांना आला आहे. वृद्ध नागरिक सरकारी सुविधेसाठी आगारात येतात. अशा वेळी त्यांच्याशी संयमाने आणि सन्मानाने संवाद साधणे अपेक्षित असताना, वारंवार हेलपाटे मारूनही समाधानकारक उत्तर मिळत नसेल तर ही बाब अधिक गंभीर बाब आहे.
एसटी महामंडळाने सवलतीच्या प्रवासासाठी एन सी एम सी कार्ड प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीचा उद्देश सवलतीच्या प्रवासात पारदर्शकता आणणे आणि डिजिटल पद्धतीने व्यवहार सुलभ करणे हा असला तरी, कार्ड काढण्याची प्रक्रिया सुरू करूनही कार्डच उपलब्ध होत नसेल आणि त्यासाठी वृद्ध नागरिकांना वारंवार आगाराच्या फेऱ्या माराव्या लागत असतील, तर डिजिटल सुविधेचा नेमका फायदा कोणाला?, असा सवाल या घटनेमुळे उपस्थित झाला आहे.



