आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबईतील बैठक आता नाशिकमध्ये;८सप्टेंबरला कालिका माता मंदिरात सकल मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक…

नाशिक प्रतिनिधी मनिष तिवडे

मराठा आरक्षणासह प्रलंबित प्रश्नांवर निर्णायक चर्चा; राज्यभरातील जिल्हानिहाय समन्वयक व समाजबांधवांची उपस्थिती

 

नाशिक,दि.६ सप्टेंबर २०२६ :

महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर निर्णायक चर्चा करून आगामी काळातील समाजाची भूमिका निश्चित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली सकल मराठा समाजाची निमंत्रित राज्यस्तरीय बैठक आता मुंबईऐवजी नाशिक येथे होणार आहे.मुंबई येथे काही कारणास्तव सभागृह उपलब्ध न झाल्याने तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील समन्वयक व समाजबांधवांशी चर्चा केल्यानंतर बैठक नाशिक येथे घेण्याबाबत एकमत झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

ही महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार, दि.८सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता नाशिकचे ग्रामदैवत कालिका माता मंदिर, मुंबई नाका येथील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये समाजासाठी काम करणाऱ्या प्रमुख समाजबांधवांना या बैठकीस निमंत्रित करण्यात आले असून, राज्यातील विविध जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.

मराठा समाजाला महायुती सरकारने SEBC अंतर्गत दिलेले १० टक्के आरक्षण सध्या न्यायप्रविष्ट आहे.या आरक्षणाला भविष्यात घटनात्मक संरक्षण मिळावे, यासाठी शासनाने कोणत्या ठोस आणि कायदेशीर उपाययोजना कराव्यात,यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सारथीच्या माध्यमातून मिळणाऱ्या योजनांचा विस्तार, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी,प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजासाठी वसतिगृहांची उपलब्धता, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक व आर्थिक सवलती तसेच मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान समाजबांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेणे या विषयांवरही समाजाची भूमिका निश्चित करण्याबाबत चर्चा होणार आहे.

याशिवाय कोपर्डी भगिनींच्या प्रकरणातील उर्वरित दोन दोषींना फाशीची शिक्षा कधी होणार?हा समाजाच्या भावनांशी निगडित अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा प्रश्न असून,या प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया व शासनाची भूमिका याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.

राज्यस्तरीय बैठकीच्या पूर्वतयारीसाठी नाशिकमध्ये बैठक

राज्यस्तरीय बैठक यशस्वी करण्यासाठी नाशिकमध्ये पूर्वनियोजनाची बैठक घेण्यात आली.मुंबई नाका येथील छावा क्रांतिवीर सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या बैठकीत राज्यस्तरीय बैठकीच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत राज्यातील समाजबांधवांसमोर मांडण्यात येणारे विविध प्रश्न,त्यावरील चर्चा,नियोजन,उपस्थिती तसेच बैठकीच्या अंतिम तयारीचा आढावा घेण्यात आला.

या पूर्वनियोजन बैठकीस मराठा समाजाचे नेते सुनील बागुल,करण गायकर, नानासाहेब बच्छाव,विलास पांगारकर,शिवाजी सहाने, चंद्रकांत बनकर,आशिष हिरे, नितीन सुगंधी,अण्णा पिंपळे, अनिल आहेर,राम निकम, वैभव दळवी,अक्षय कातड, सागर लोणे,विनायक ढेमसे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील अनेक समाजबांधव उपस्थित होते.

या बैठकीत राज्यस्तरीय बैठकीत होणाऱ्या चर्चेच्या विषयांवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.तसेच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून येणाऱ्या समाजबांधवांच्या स्वागतापासून ते बैठकीच्या व्यवस्थापनापर्यंतची आवश्यक पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली.

सर्व जिल्ह्यांतील समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन

मराठा समाजाच्या प्रश्नांवर केवळ चर्चा न करता एकत्रित आणि ठोस भूमिका निश्चित करण्यासाठी ही राज्यस्तरीय बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सकल मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितले.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये सकल मराठा समाजाच्या माध्यमातून काम करणाऱ्या समन्वयकांनी,पदाधिकाऱ्यांनी आणि समाजबांधवांनी दि.८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता कालिका माता मंदिर सभागृह,मुंबई नाका,नाशिक येथे आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.