मोदींचा १२ वर्षांतील कारभारच सत्ताबदलाला कारणीभूत ठरेल – पृथ्वीराज चव्हाण!
नाशिक प्रतिनिधी

केंद्रातील आगामी सत्ताबदलाला कोणताही विरोधक किंवा राजकीय पक्ष कारणीभूत ठरणार नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मागील १२ वर्षांतील एकूण कारभारच २०२९ मध्ये सत्ताबदलाला कारणीभूत ठरेल, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
२०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत केंद्रात सत्ताबदल निश्चित असल्याचे सांगत चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे मोदी सरकारची झोप उडाली असून, आगामी काळात नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, याची जाणीव सत्ताधाऱ्यांना झाली आहे. त्यामुळे केंद्रात नेतृत्वबदलाच्या हालचाली सुरू असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपपंतप्रधान होण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा त्यांनी केला.
देशातील शिक्षण व्यवस्थेच्या स्थितीवरही चव्हाण यांनी चिंता व्यक्त केली. प्रल्हाद जोशी यांच्याकडे आधीच तीन महत्त्वाची खाती असताना शिक्षण खात्याचा अतिरिक्त भार देणे चुकीचे आहे. शिक्षण हे ‘पार्ट-टाइम’ खाते नसून, परीक्षांमधील गोंधळ सोडविण्यासह विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेणारा पूर्णवेळ शिक्षणमंत्री देशाला हवा, असे ते म्हणाले.
मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंड दौऱ्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जागेचे ‘शुद्धीकरण’ केल्याच्या घटनेचा निषेध करत चव्हाण यांनी ही विकृत मानसिकता असल्याची टीका केली. ईडी, सीबीआय व प्राप्तिकर विभागाचा वापर करून विरोधी पक्ष फोडले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
फडणवीसांच्या नावाला तीव्र विरोध
देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात शिक्षणमंत्रिपद दिल्याच्या चर्चेवर चव्हाण यांनी तीव्र विरोध दर्शविला. महाराष्ट्रातील पेपरफुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस शिक्षण खात्यासाठी योग्य नसल्याचे ते म्हणाले. त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री केले तर काँग्रेसकडून त्याला तीव्र विरोध केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.



