आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय

रिंग रोडप्रश्नी शेतकऱ्यांची कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे धाव; पुराव्यांसह मांडला अन्यायाचा पाढा

नाशिक प्रतिनिधी

नाशिक : नाशिक रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या १४ गावांतील शेतकऱ्यांनी आज कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह साहेब यांची छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या समवेत भेट घेऊन रिंग रोडच्या भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत सविस्तर चर्चा केली.यावेळी रिंग रोडच्या संदर्भातील विविध बाबींचे पुरावे, कागदपत्रे आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांचा समावेश असलेले सविस्तर निवेदन कुंभमेळा आयुक्तांकडे सादर करण्यात आले.

रिंग रोडच्या प्रस्तावित अलाइनमेंटमुळे शेतकऱ्यांची शेती,घरे, विहिरी,बोअरवेल,फळबागा आणि इतर महत्त्वाच्या मालमत्तांवर परिणाम होत असून,भूसंपादनाच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळत नसल्याची भूमिका यावेळी शेतकरी प्रतिनिधींनी मांडली.प्रकल्पाच्या विविध टप्प्यांमध्ये प्रशासनाकडून झालेल्या कार्यवाहीबाबतही शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले.

नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि एमएसआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यापर्यंत रिंग रोडच्या संदर्भात चुकीची अथवा अपूर्ण माहिती पोहोचवून दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप यावेळी शेतकरी प्रतिनिधींनी केला.या आरोपांच्या समर्थनार्थ उपलब्ध असलेली कागदपत्रे,पुरावे आणि संबंधित बाबींचा तपशील असलेले निवेदन कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे देण्यात आले.

रिंग रोड बाधित शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा,अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.तसेच भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या शेतीचे स्वरूप,फळबागा,विहिरी,बोअरवेल,पाण्याचे स्रोत आणि इतर मालमत्तांचे योग्य मूल्यांकन करून त्यानुसार जास्तीत जास्त आणि न्याय्य मोबदला मिळावा,अशी मागणीही शेतकरी प्रतिनिधींनी केली.

यावेळी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी शेतकरी प्रतिनिधींचे म्हणणे सविस्तरपणे ऐकून घेतले.शेतकऱ्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची आणि पुराव्यांची माहिती घेऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.त्यामध्ये जे योग्य आहे आणि जे करता येणे शक्य आहे,ते करण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील,असे आश्वासन त्यांनी दिले.

तसेच रिंग रोड बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आणि योग्य मोबदला मिळावा,यासाठी आवश्यक त्या बाबींची तपासणी केली जाईल.विशेषतःजिरायती आणि बागायती जमिनींच्या नोंदी, फळबागा,पाण्याचे स्रोत आणि संबंधित मूल्यांकनाच्या ज्या प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेल्या नसतील,त्याबाबतची माहिती घेऊन आवश्यक ते निर्देश दिले जातील,असेही त्यांनी स्पष्ट केले.

रिंग रोडच्या अलाइनमेंटच्या अंतिम निर्णयाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील,त्या निर्णयाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येईल,असे आश्वासनही कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी शेतकरी शिष्टमंडळाला दिले.

या बैठकीमुळे रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनी मांडलेल्या प्रश्नांना प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवर पुन्हा एकदा गांभीर्याने मांडण्याची संधी मिळाली असून,आता सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे वस्तुनिष्ठ चौकशी होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळेलअशी अपेक्षा शेतकरी प्रतिनिधींनी व्यक्त केली.

या बैठकीस छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर दीपक हगवणे सुदर्शन पाटील सुदाम जाचक अक्षय कातड सागर लोणे मधुकर पोरजे यांच्यासह नाशिक रिंग रोडमुळे बाधित होणाऱ्या १४ गावांतील प्रमुख शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.