लासलगावच्या नागरी समस्यांवर ‘शहर विकास समिती’ आक्रमक; तातडीने उपाययोजनांची मागणी
लासलगावच्या नागरी समस्यांवर ‘शहर विकास समिती’ आक्रमक; तातडीने उपाययोजनांची मागणी

लासलगाव शहरातील विविध प्रलंबित नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधत लासलगाव शहर विकास समितीच्या वतीने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगनराव भुजबळ यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार अर्ज साद करण्यात आला आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर, आरोग्यावर आणि सुरक्षिततेवर परिणाम करणाऱ्या समस्यांचा तातडीने निपटारा करावा, अशी मागणी समितीने केली आहे.
समितीने सादर केलेल्या निवेदनात कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमाल विक्रीची रक्कम शेतकऱ्यांना रोख स्वरूपात देण्याबाबत आदेश करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
शहरातील पिण्याच्या पाण्याची अनियमितता दूर करून नागरिकांना दररोज स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे, यासाठी ठोस कार्यवाही करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
लासलगाव-पालखेड-पिंपळगाव रस्त्याच्या कामासह बाजार समिती परिसरातील वाढत्या वाहतुकीचा प्रश्न गंभीर असल्याचे समितीने नमूद केले आहे. कोटमगाव चौफुली ते सिटी प्राईड मॉलपर्यंत दुभाजक उभारणे, पावसाचे पाणी व सांडपाण्यासाठी गटार व्यवस्था करणे, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यालगत रेलिंग व फुटपाथची व्यवस्था करणे, तसेच पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनमुळे होणारी पाण्याची नासाडी टाळण्यासाठी पाइपलाइन गटाराच्या बाहेरील बाजूस घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय कोटमगाव चौफुली ते नवीन मार्केटपर्यंत दुभाजकावर स्ट्रीट लाईट बसविणे, लासलगाव शहरातील मंजूर शिवनदी संवर्धनाचे काम तातडीने सुरू करणे, तसेच शास्त्रीनगरजवळील कचरा डेपोमुळे नागरिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे.
गावातील काही शाळा व संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा शालेय पोषण आहार मिळत असल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गांवरील खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती व डांबरीकरण करण्यात यावे, असेही समितीने म्हटले आहे.
या निवेदनावर प्रकाश पाटील , धर्मेश जाधव प्रमोद पाटील , राजेश कराड, संदीप उगले, विकास कोल्हे, चंद्रकांत नेटारे, स्मिता कुलकर्णी ,अनिता खैरे,बबन शिंदे ,साहेबराव खलसे इतर पदाधिकारी यांच्या वतीने प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे.
शहराच्या विकासासाठी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृती करावी, अशी अपेक्षा लासलगाव शहर विकास समितीने व्यक्त केली आहे.



